साडेचार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ‘ती’ मृत्यूच्या दाढेतून बाहेर...!
By Admin | Updated: August 8, 2014 00:43 IST2014-08-07T21:52:43+5:302014-08-08T00:43:15+5:30
तळमळणाऱ्या जीवासाठी तळमळीची प्रार्थना...!

साडेचार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ‘ती’ मृत्यूच्या दाढेतून बाहेर...!
रत्नागिरी : देवरूख-आंबव येथील राजेंद्र माने इंजिनियरिंग कॉलेजच्या हल्ला झालेल्या विद्यार्थिनीची प्रकृती आता स्थिर आहे. तिच्यावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. तब्बल साडेचार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. जिंंकायचंच असा ध्यास धरत चिरायु हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे शस्त्रक्रियेचे आव्हान स्वीकारले. क्षणाक्षणाला वेगवेगळी आव्हाने समोर येत होती, त्यासाठी तज्ज्ञांचे सल्लेही घेतले जात होते. आॅपरेशन थिएटरमधील डॉक्टर्सनी आपला वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव, कौशल्य पणाला लावत अखेर तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. नवं आयुष्यच दिलं तिला. या साडेचार तासांतील अनुभवलेला थरार विसरता येणार नाही, असे या डॉक्टर्सनी सांगितले.
बुधवारी २.३० वाजता खानावळीतून भोजन आटोपून महाविद्यालयाकडे परत जाणाऱ्या युवतीवर प्राणघातक हल्ला झाला. पोटात दोन व कुशीत एक असे चाकूचे तीन खोलवर वार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या युवतीला तातडीने रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सायंकाळी चार वाजल्यानंतर साळवी स्टॉप येथील या रुग्णालयात वातावरण गंभीर बनले. तिचा जीव वाचू दे, अशी मनोमन प्रार्थना करत अनेक विद्यार्थीही रूग्णालयात आले होते. सव्वाचार वाजता तिला आॅपेरेशन थिएटरमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर साडेचार तास तिच्यावरील शस्त्रक्रिया सुरू होती.
सर्वसामान्यांच्या अंगावर काटा उभा राहील, असा अनुभव सांगताना चिरायु रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश चव्हाण म्हणाले की, मुलगी रक्ताच्या थारोळ्यात होती. पोटात डाव्या बाजूला, उजव्या बाजूला खोलवर वार झाले होते. डाव्या कुशीतही खोल वार झाला होता. त्यामुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात सुरू होता. पोटातील दोन्ही वार जवळ-जवळ असल्याने तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती. आतड्यांना आठ ठिकाणी भोकं पडली होती. तेथून रक्त भळभळून वाहात होते. तातडीने शस्त्रक्रिया करून ही भोकं बंद करण्यात आली.शस्त्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर शरीराच्या अंतर्गत भागात फार काही दुखापती, जखमा नसतील, असे प्रथम वाटत होते. मात्र, आतील चाचपणी सुरू केल्यानंतर प्रकरण साधे, सोपे नाही, याची कल्पना आली. परंतु कसलीही तमा न बाळगता शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू केले गेले. पोटातील जखमा गंभीर होत्या, तरी सुदैवाने यकृत (लिव्हर) सुरक्षित होते. डाव्या कुशीतील वार बरगडीपर्यंत पोहोचला होता. बरगडीला इजा झाली होती. त्याहीपेक्षा किडनीला छेद गेल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. किडनी स्टोनसाठीच्या शस्त्रक्रियेवेळी जसा छेद दिला जातो तसाच हा छेद होता. किडनीचा छेद शिवणे कठीण नव्हते. परंतु त्यात धोका वाटत होता. दुसरी किडनी सुरक्षित आहे, वा नाही, याबाबत काही स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरचे मत जाणून घेण्यात आले. सुरू असलेल्या उपचाराला त्यांच्याकडूनही पुष्टी मिळाली. त्यामुळे या छेद गेलेल्या किडनीचा रक्तस्त्राव बंद होईल, अशी उपाययोजना करण्यात आली. छेद शिवण्यापेक्षा हा उपाय अधिक विश्वासार्ह होता. त्यामुळे रक्तस्त्रावही थांबला. अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करताना कुठे काही कमी राहणार नाही, याकडे लक्ष देण्यात आले. अखेर साडेचार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तिला डॉक्टर्सनी नवं आयुष्य दिलं.
या युवतीची प्रकृती आता स्थिर आहे. ४८ तासांनंतर तिच्या पुढील चाचण्या केल्या जातील. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या या युवतीच्या सर्व वैद्यकीय चाचण्या आधी कराव्या लागणार होत्या. परंतु तिची स्थिती खूपच नाजूक होती. वेळ अत्यंत अपुरा होता. चाचण्या करण्याआधीच तिच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक होते. तिला वाचविणे हे पहिले कर्तव्य होते. त्यामुळेच वैद्यकीय चाचण्यांना फाटा देत आधी शस्त्रक्रिया आणि नंतर चाचण्या हे सूत्र अवलंबिण्यात आले. (प्रतिनिधी)
तळमळणाऱ्या जीवासाठी तळमळीची प्रार्थना...!
रुग्णवाहिकेतून ती रुग्णालयात दाखल झाली तीच तळमळत, मृत्यूशी युध्द खेळत. माहीत नव्हतं काय होईल? तरीही चिरायु रुग्णालयात तिला दाखल करून घेण्यात आले. तिला झालेल्या जखमा आणि तिची अवस्था पाहून वातावरणच हेलावून गेलं. तिच्यावरील या अन्यायाची कथा ऐकल्यावर तर साऱ्यांचेच डोळे पाणावले. डॉक्टर्सही प्राधान्याने तिच्यासाठी धावले. सारे कर्मचारी एकच प्रार्थना करत होते की, आॅपेरशन थिएटरमध्ये गेलेला हा जीव वाचू दे. ही मनोमन प्रार्थना फळाला आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, डॉक्टर्सच्या हातांना यश आलं.