निवडणुकीनंतर खर्चाकडे पाठ

By Admin | Updated: July 2, 2014 00:08 IST2014-07-02T00:04:31+5:302014-07-02T00:08:26+5:30

राणेंचा खर्च सर्वाधिक : दोन उमेदवारांवर कारवाई होण्याची शक्यता

After the election, read the expenditure | निवडणुकीनंतर खर्चाकडे पाठ

निवडणुकीनंतर खर्चाकडे पाठ

रत्नागिरी : सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या दहा उमेदवारांपैकी आठ उमेदवारांनी आपला निवडणुकीसाठी झालेला एकूण खर्च जूनमध्ये सादर केला. दोन उमेदवारांनी मात्र खर्च सादर न केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा आयोगाकडून उगारला जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सर्वाधिक खर्च आघाडीचे उमेदवार नीलेश राणे यांचा असून, द्वितीय क्रमांकावर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत आहेत.
निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण यावे, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली असून, ती ७० लाख इतकी केली आहे. निवडणूक आयोगाने या खर्चावर अंकुश ठेवत उमेदवारांना अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक होईपर्यंत तीन टप्प्यात खर्च सादर करण्याचे आदेश दिले होते. तिसऱ्या टप्प्यापर्यंतचा एकूण झालेला खर्च मतदान झाल्यानंतर एक महिन्याच्या आत दाखल करण्याचे आदेश होते.
त्यानुसार रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीचे विनायक राऊत, काँग्रेस आघाडीचे नीलेश राणे, बहुजन समाज पार्टीचे राजन आयरे, आपचे अभिजीत हेगशेट्ये, सोशालिस्ट पार्टीचे अ‍ॅड. दीपक नेवगी तसेच अपक्ष सुनील पेडणेकर, अरूण मांजरेकर, अजिंक्य गावडे या आठ उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला. मात्र, बहुजन मुक्ती मोर्चाचे यशवंत बिर्जे आणि अखिल भारत हिंदू महासभेचे विनोद सावंत या दोन उमेदवारांनी मात्र अद्याप खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वाधिक खर्च नीलेश राणे यांचा असून, तो ५५ लाख ३० हजार ९४६ इतका आहे. विजयी झालेले उमेदवार विनायक राऊत यांचा खर्च ३७ लाख ४ हजार १७१ इतका आहे. अभिजीत हेगशेट्ये, राजेंद्र आयरे, अ‍ॅड. दीपक नेवगी, सुनील पेडणेकर या चौघांचा खर्च अनुक्रमे ३,६५,४५६, २,0९,६०७, १,८८,१४८, १,१९,१४४ इतका आहे. अरूण मांजरेकर यांचा ९०,९४५ आणि अजिंक्य गावडे यांचा खर्च ८०,0२७ इतका आहे. यापैकी बहुजन मुक्ती पार्टीचे यशवंत बिर्जे आणि हिंदू महासभेचे विनोद सांवत यांनी अजूनही खर्च सादर केलेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: After the election, read the expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.