मृत्यूनंतर त्यांनी अंधांना दिली दृष्टी अन् मेडिकल विद्यार्थ्यांना ज्ञान
By Admin | Updated: September 30, 2014 00:13 IST2014-09-30T00:11:25+5:302014-09-30T00:13:25+5:30
समाजाचे आपण काही देणं लागतो. या भावनेने

मृत्यूनंतर त्यांनी अंधांना दिली दृष्टी अन् मेडिकल विद्यार्थ्यांना ज्ञान
चिपळूण : नेत्रदान हे सर्वांत महान दान आहे. आपण समाजात जन्मलो. त्या समाजाचे आपण काही देणं लागतो. या भावनेने काहीजण विविध क्षेत्रात काम करीत असतात. चिपळूण शहरातील मार्कंडी येथील वंदना सुहास पंडित (४७) यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान केल्याने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या नेत्रदानाने अंधाला दृष्टी मिळाली आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आशिर्वाद मिळाला.
सह्याद्री निसर्गमित्र व संघर्ष क्रीडा मडळ या सामाजिक संस्थेतर्फे प्रथमच कोकणात नेत्रदान मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान काहींची मृत्यूपश्चात नेत्रदानाची संकल्पपत्र भरुन घेण्यात आली होती. यामध्ये सुहास पंडित व त्यांच्या पत्नी वंदना यांचा समावेश होता. मार्कंडी येथे वास्तव्यास असलेल्या वंदना यांना थोडासा ताप आला म्हणून त्यांना देवधर यांच्या दवाखान्यात रविवारी दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्री १०.४५ वाजता त्यांचे निधन झाले. सह्याद्री निसर्ग मित्रचे सचिव उदय पंडित यांना याबाबत सांगण्यात आले. डॉ. ग. ल. जोशी यांच्याकडे संबंधित संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. रात्री ११.१५ वाजता डॉ. जोशी हे दवाखान्यात आले. त्यांनी वंदना पंडित यांचे नेत्र (कॉर्निया) काढून सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले. सह्याद्री निसर्गचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी हे दृष्टीदान आयबँक, सांगली येथील डॉ. किल्लेदान यांच्या स्वाधीन केले. वंदना पंडित यांच्या नेत्रदानाने आता अंधांना जग पाहता येणार आहे. सामाजिक बांधिलकीचा वसा जपणाऱ्या पंडित कुटुंबीयांनी नेत्रदानावरच न थांबता वंदना यांचे मरणोत्तर देहदानही केले. कृष्णा आयुर्विमा संस्था अमिमन विद्यापीठ, कराडद्वारा कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टकडे संपर्क साधून आज (सोमवारी) त्यांचा मृतदेह संस्थेकडे देहदान म्हणून पाठवण्यात आला. वर्षभरापूर्वी जनजागृतीचा उपक्रम सह्याद्री निसर्ग मित्र व संघर्ष क्रीडा मंडळाने राबवला होता. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. ज्या व्यक्तिंना नेत्रदान करायचे आहे, त्यांनी अध्यक्ष भाऊ काटदरे, खजिनदार कमलाकर बेंडके यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
समाजासमोर ठेवला एक आदर्श.
अंध व्यक्तिला मिळणार दृष्टी.
सह्याद्री निसर्ग मित्रच्या आवाहनाला प्रतिसाद.
कोकणात प्रथमच नेत्रदान मोहीम.
सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांनी धावाधाव करून नेत्र काढण्यात मिळवले यश.