अखेर जिल्हा परिषदेवर युतीचा भगवा
By Admin | Updated: September 22, 2014 00:50 IST2014-09-22T00:45:56+5:302014-09-22T00:50:22+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षपदी जगदीश राजापकर

अखेर जिल्हा परिषदेवर युतीचा भगवा
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदी जगदीश राजापकर आणि उपाध्यक्षपदी सतीश शेवडे यांची बिनविरोध निवड झाली़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजपा युतीचा भगवा फडकल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोश केला़
विधानसभेच्या जागा वाटपावरुन शिवसेना - भाजपामध्ये युती होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी जिल्ह्यात मात्र आजच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये युती अभेद्य असल्याचा संदेश दोन्ही पक्षांकडून देण्यात आला़ अर्ज भरण्यापूर्वी शिवसेना - भाजपा युतीच्या जिल्हाप्रमुख, आमदार व पदाधिकाऱ्यांची उपाध्यक्ष राजेश मुकादम यांच्या दालनात बैठक झाली़
अध्यक्षपदासाठी युतीकडून शिवसेनेचे राजापकर, काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रकाश शिगवण आणि उपाध्यक्षपदासाठी युतीकडून भाजपाचे सतीश शेवडे व काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे बाळकृष्ण जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ निवडणूक निर्णय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी शिवाजी सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करुन घेतले़
राष्ट्रवादीचे प्रकाश शिगवण, बाळकृष्ण जाधव यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली़ त्यामुळे शिवसेनेचे राजापकर आणि भाजपाचे शेवडे हे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.यावेळी आमदार राजन साळवी, आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार बाळ माने, गणपत कदम, सुभाष बने, राष्ट्रवादीचे संजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, मावळत्या अध्यक्ष मनीषा जाधव उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
निवड जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राजापकर व उपाध्यक्ष शेवडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. हा सभागृहात चर्चेचा विषय बनला होता.
अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. मात्र, सर्व सभापतीपदे युतीकडे होती. मात्र, अध्यक्षपद काँग्रेस आघाडीकडे होते. आजच्या निवडणुकीने अध्यक्षपद शिवसेनेकडे आल्याने जिल्हा परिषदेवर आता निर्विवादपणे युतीची सत्ता आली आहे.
जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जगदीश राजापकर हे शिरवली गावचे सुपुत्र असून, भांबेड (ता. लांजा) जिल्हा परिषद गटातून, तर उपाध्यक्ष सतीश शेवडे हे कोतवडे (ता. रत्नागिरी) जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोन्ही शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती आहेत.