नगरसेवकांची वरिष्ठांकडून कानउघाडणी
By Admin | Updated: May 22, 2015 00:14 IST2015-05-21T22:45:40+5:302015-05-22T00:14:50+5:30
रत्नागिरी पालिका : शिवसेनेच्या गटनेत्याचाही समावेश

नगरसेवकांची वरिष्ठांकडून कानउघाडणी
रत्नागिरी : आरक्षित भूखंड मूळ मालकांना स्वखर्चाने विकसित करण्यासाठी देण्याचा ठराव मांडणाऱ्या तीन नगरसेवकांची जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह वरिष्ठांनी खास शैलीत कानउघाडणी केली आहे. या तीन नगरसेवकांमध्ये पालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्याचाही समावेश आहे.
मंगळवारी झालेल्या रत्नागिरी पालिकेच्या सभेत या तीन नगरसेवकांनी आरक्षित भूखंडाचा ठराव मांडताना हे भूखंड मूळ मालकांना स्वखर्चाने विकसित करण्यासाठी द्यावेत, असे म्हणणे मांडले होते. याबाबत सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी संतापले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा या तिन्ही नगरसेवकांना विश्रामगृहावर बोलावून घेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांची कानउघाडणी करण्यात आली.
आपल्याला जनतेने शहर विकासासाठी संधी दिली आहे, याचे भान ठेवा, अशा शब्दात या नगरसेवकांची खरडपट्टी काढण्यात आली. एवढेच नव्हे; तर या ठरावाची दखल खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून, पुढील पालिका सभेत इतिवृत्ताला मान्यता देताना हा ठराव नामंजूर करण्याचे आदेश नगरसेवकांना देण्यात आले आहेत.
मांडलेल्या ठरावानुसार पालिका हद्दीतील तब्बल १३५ आरक्षित भूखंड मूळ मालकांना परत देण्याचे ठरवण्यात आले होते. या ठरावावरून शिवसेनेत फूट पडली होती. माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राहुल पंडित, सलील डाफळे, स्वीकृत नगरसेवक विकास पाटील यांनी या ठरावाला विरोध दर्शवला होता. मात्र, हा विरोध डावलून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी या ठरावाला मंजुरी दिली होती. शिवसेनेत फूट पडल्याची चर्चा शहरभर पसरल्याने तसेच आरक्षित भूखंडाबाबत सेनेमध्ये दोन गट पडल्याने याची दखल वरिष्ठांना घेणे भाग पडले. त्यामुळे या नगरसेवकांची कानउघाडणी करण्यात आली. (प्रतिनिधी)