आरटीईअंतर्गत ६०९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:39+5:302021-04-20T04:32:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत नुकतीच ...

आरटीईअंतर्गत ६०९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत नुकतीच काढण्यात आली. या सोडतीत जिल्ह्यातील ६०९ मुलांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर संकेतस्थळावर प्रवेशांबाबत नवीन सूचना व तारखा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
आरटीईनुसार वंचित गटातील बालकांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश देण्यात येतो. जिल्हयातील ९५ शाळांतील ८६४ जागांसाठी ८११ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६०९ जणांची निवड करण्यात आली. संकेतस्थळावरून प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून काढून टाकण्यात आल्या असून, सोडतीचे प्रवेश घेण्यासाठी शिक्षण संचालनालय सुधारित तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.
कोरोनामुळे सर्वत्र शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळेच शासनाने नियोजित प्रवेशाच्या तारखा रद्द करून सुधारित तारखा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात आली. या सोडतीत ६७ हजार ५५३ बालकांना प्रवेश निश्चित करण्यात आले होते.
सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दि.३० एप्रिलपर्यंत विभागातील पडताळणी समितीतर्फे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यावा, असे सांगितले होते. प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत संकेतस्थळावर प्रवेशाच्या तारखांबाबत नवीन सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. शासकीय निर्बंधामुळे पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.