मृतदेहावरील अंत्यसंस्कारांसाठी प्रशासनच पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:59+5:302021-04-25T04:31:59+5:30
आबलोली : घरात तीन माणसं. वृद्ध महिला आणि तिची दोन मुले. तिघंही कोरोना पॉझिटिव्ह. दुर्दैवाने कोरोनाने त्या महिलेचा जीव ...

मृतदेहावरील अंत्यसंस्कारांसाठी प्रशासनच पुढे
आबलोली : घरात तीन माणसं. वृद्ध महिला आणि तिची दोन मुले. तिघंही कोरोना पॉझिटिव्ह. दुर्दैवाने कोरोनाने त्या महिलेचा जीव घेतला. त्यावेळी तिचा मोठा मुलगा रुग्णालयात, तर लहान मुलगा घरी अत्यवस्थ होता. अंत्यसंस्कार करणार कोण, असा मोठा प्रश्न होता. अशावेळी ग्रामपंचायत प्रशासन पुढे आले. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशा आठजणांनी सर्व सोपस्कार करून त्या महिलेला अग्नी दिला आणि माणुसकी अजून जिवंत असल्याचे दाखवून दिले. माणुसकीची ही ज्योत तेवत ठेवणारे गाव आहे गुहागर तालुक्यातील खोडदे.
कोरोनाने आता ग्रामीण भागातही वेगाने हातपाय पसरले आहेत. गुहागर तालुक्यातील खोडदे गावात एका वृद्ध महिलेचे कोरोनाने निधन झाले. कोरोनाग्रस्त महिला गृह विलगीकरणात होती. तिथेच तिचे निधन झाले. कोरोनामुळेच त्यांचा मोठा मुलगा रुग्णालयात, तर छोटा मुलगा घरी अत्यवस्थ अवस्थेत होता. अशा कठीण परिस्थितीत मृतदेहावर अंतिम संस्कार कोणी आणि कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला. आपल्यासमोर असलेल्या आईच्या मृतदेहावर आपण अंत्यसंस्कार करू शकत नसल्याच्या वेदना एका मुलाला अनुभवाव्या लागत होत्या, तर रुग्णालयात असलेल्या दुसऱ्या मुलाला दुर्दैवी प्रसंगाची कल्पनाही नव्हती.
कोरोनाच्या भीतीपोटी मृतदेहाला खांदा द्यायला कोणी पुढे येणे शक्य नव्हते. त्यावेळी गावचे प्रशासन पुढे आले. ग्रामसेवक महेंद्र निमकर, तलाठी आनंद काजरोळकर, पोलीस पाटील महेश भाटकर, सरपंच प्रदीप मोहिते, उपसरपंच लवेश पवार, कोतवाल प्रकाश बोडेकर, ग्रामपंचायत लिपिक नितीन मोहिते, शिपाई वैभव निवाते अशा अवघ्या आठजणांनी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याचे ठरविले. स्मशानभूमी सुमारे १.५ कि.मी. दूर असल्याने मृतदेह तिथपर्यंत न्यायचा कसा, हा प्रश्न होता. त्यावेळी गावातील एका छोट्या टेम्पोत प्लास्टिकमध्ये गुंडाळून मृतदेह स्मशानभूमीत आणला गेला. पोलीस पाटील महेश भाटकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथून पीपीई कीट आणले. ग्रामसेवक महेंद्र निमकर यांनी पीपीई कीट घालून एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने प्रकाश बोडेकर, वैभव निवाते यांनी खांदा दिला. शेवटी तलाठी आनंद काजरोळकर यांनी मृतदेहाला अग्नी दिला.
कोरोनाने माणसातली माणुसकी संपत असल्याची अनेक उदाहरणे ऐकत असताना खोडदे ग्रामपंचायत प्रशासनाने निभावलेली ही भूमिका केवळ कर्तव्य भावनेपुरती मर्यादित राहत नसून, मानवतेची साक्ष पटवून देणारी आहे.