समायोजन लाभदायक की नुकसान करणारे...
By Admin | Updated: September 1, 2014 00:00 IST2014-08-31T21:59:47+5:302014-09-01T00:00:18+5:30
पदवीधर शिक्षकांच्या रिक्त १ हजार २०० पदांपैकी ५०० पदे भरण्यात आली.

समायोजन लाभदायक की नुकसान करणारे...
खाडीपट्टा : रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून नुकतीच १९८६ ते १९९६ अखेर अनोसुता असलेल्या पदवीप्राप्त शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार सरळ पदोन्नती देऊन सहावी व सातवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित पदवीधर शिक्षक त्यांना नेमून देण्यात आलेल्या शाळांवर रुजूदेखील झाले आहेत.
पदवीधर शिक्षकांच्या रिक्त १ हजार २०० पदांपैकी ५०० पदे भरण्यात आली. उर्वरित ७०० पदांसाठी १९९६ ते २००६ पर्यंत अनोसुता असलेल्या पदवीधारक शिक्षकांच्या समायोजनासाठी बोलवण्यात येणार आहे. त्यासाठी पदवीधारक शिक्षकांची माहिती सर्व पंचायत समिती कार्यालयाकडून मागवण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रक्रियेत सहावी व सातवीच्या दोन इयत्तांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. इयत्ता आठवीसाठी त्यामुळे आॅक्टोबर - नोव्हेंबरपर्यंत शिक्षकच मिळणार नाही. याचे प्रमुख कारण शिक्षणाचा अधिकार. यामुळे सातवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना आठवीचा वर्ग जोडण्यात येत आहे. त्यामुळे आठवीच्या वर्गासाठी आस्थापना सप्टेंबर महिन्यामध्ये तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच आठवीच्या वर्गासाठी शिक्षक मिळणार आहेत. तोपर्यंत आठवीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषा शिकवण्यासाठी एक भाषा विषयात पदवीप्राप्त शिक्षक, गणित व विज्ञान विषयांसाठी त्या विषयामध्ये पदवीप्राप्त शिक्षक व सामाजिक शास्त्र शिकवण्यासाठी इतिहास किंवा भूगोल विषयात पदवीप्राप्त शिक्षक नेमणे गरजेचे आहे. पदवीधर शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी वेगळी प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे यापुढील कार्यवाही काय होईल, इकडे शिक्षकवर्गाचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात नुकतेच शिक्षण विभागाकडून पदवीधर शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. परंतु, समायोजनात बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमातील निकष डावलण्यात आले असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती शिक्षण क्षेत्रात वर्तवण्यात येत आहे. पदवीधारकांनी ज्या विषयातील पदवी संपादन केली आहे, त्याचा लाभ अत्यल्प प्रमाणात विद्यार्थ्यांना होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.