अतिरिक्त शिक्षक प्रश्न मार्गी
By Admin | Updated: December 9, 2014 23:18 IST2014-12-09T21:52:53+5:302014-12-09T23:18:01+5:30
संचमान्यतेला अनुकूल : शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर रामनाथ मोते यांनी उपोषण सोडले

अतिरिक्त शिक्षक प्रश्न मार्गी
वाटूळ : २०१३-१४च्या संचमान्यतेत बदल करुन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवू नये. शिक्षणसेवकांना सेवा संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष, आमदार ना. गो. गाणार व कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरु केले.
या विषयासंदर्भात राज्याच्या शिक्षण सचिव अश्विनी भिडे, शिक्षण आयुक्त चोकलिंगम तसेच राज्यातील सर्व शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांची बैठक आयोजित करुन आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे लेखी पत्र दिल्यानंतर आमदारांनी उपोषण मागे घेतले. शिक्षक परिषदेच्या आमदारांनी तात्पुरते उपोषण मागे घेतले असून, आजच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री कोणता निर्णय घेतात, यावर शिक्षक परिषदेच्या पुढच्या आंदोलनाची रणनीती ठरणार असल्याचे रत्नागिरी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले. या प्रश्नावर मोते यांनी गेले काही काळ आंदोलन छेडले होते. यंदा मोते यांना या प्रश्नावर स्वसरकारविरोधातच दंड थोपटावे लागले आहेत. (वार्ताहर)
शिक्षणसेवक, संचमान्यतेवर चर्चा
शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणसेवक यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भात आमदार रामनाथ मोते यांनी नागपूर विधानभवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रश्नाबाबत आपण राज्याच्या शिक्षण संचालकांशी बोलून यावर तोडगा काढू, असे लेखी आश्वासन यावेळी आमदारांना दिल्यानंतर त्यांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते व ना. गो. गाणार बसले आमरण उपोषणाला.
शिक्षणसेवकांच्या सेवेला संरक्षण.
संचमान्यतेबाबत सकारात्मक निर्णय.
शिक्षणसेवकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर निर्णय दृष्टीपथात.
तावडे यांनी दिले शिक्षक आमदारांना आश्वासन.