खरं स्वातंत्र्य अजून मिळवायचंय : मधुकर हिलम
By Admin | Updated: September 25, 2014 23:28 IST2014-09-25T22:23:26+5:302014-09-25T23:28:35+5:30
आदिम कातकरी संघटना : चिपळुणात नाग्या महादू कातकरी पुण्यतिथी

खरं स्वातंत्र्य अजून मिळवायचंय : मधुकर हिलम
चिपळूण : १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, रानावनात भटकणारा कातकरी बांधव आजही विविध शासकीय सेवा सुविधांपासून वंचित आहे. या समाजाचा सर्व्हे करण्याचे काम सुरु आहे. खरं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हायला हवे असे आवाहन आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मधुकर हिलम यांनी येथे आज गुरुवारी केले.
शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहामध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची ८५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष प्रभाकर वाघे, मुख्य सचिव कमलाकर हिलम, सल्लागार शंकर वाघ, जिल्हाध्यक्ष विलास निकम, कार्याध्यक्ष सुरेश निकम, अॅड. विजय साठे, आदिवासी प्रकल्पाचे प्रतिनिधी एस.पी.चव्हाण, सचिव चंद्रकांत जाधव, शांता मुकणे, मंजुळा हिलम, शालिनी हिलम, तालुकाध्यक्ष शशिकांत हिलम, रमेश वाघ, नाना हिलम, नंदू पवार आदींसह हजारो कातकरी समाजबांधव उपस्थित
होते.
कातकरी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी पालकांनी त्यांना शाळेत जाण्याचा आग्रह धरला पाहिजे. आश्रम शाळेत मुलांना शिक्षणासाठी पाठविले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळूनही हा समाज शासकीय सेवा सुविधांपासून वंचित जीवन जगत आहे. प्रत्येक वाडीवस्तीवर रस्ता व्हायला हवा. समाज मंदिरही उभी राहिली पाहिजेत. या समाजाचा सर्व्हे करण्यात न आल्यामुळे शासनाकडे निधी असूनही तो खर्च केला जात नाही. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. स्वातंत्र्याची खरी लढाई आपल्याला जिंंकायची आहे असेही हिलम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोहिते यांनी केले. (वार्ताहर)