पोषण आहारप्रकरणी दोषींवर कारवाई करावी
By Admin | Updated: February 2, 2015 23:51 IST2015-02-02T22:32:11+5:302015-02-02T23:51:03+5:30
स्नेहा मेस्त्री : विभागीय आयुक्तांसमोर मांडले म्हणणे

पोषण आहारप्रकरणी दोषींवर कारवाई करावी
चिपळूण : शालेय पोषण आहार वाटपप्रकरणी जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व मुलांना सकस, दर्जेदार पोषण आहार पुरवठा करावा, असे आपले म्हणणे खेर्डीच्या पंचायत समिती सदस्या स्नेहा सुनील मेस्त्री यांनी आज (सोमवारी) कोकण विभागीय आयुक्तांसमोर मांडले.कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे शालेय पोषण आहाराच्या चौकशीसाठी पंचायत समिती सदस्या मेस्त्री यांना बोलावण्यात आले होते. यावेळी मेस्त्री यांनी सविस्तर चर्चा केली व आपले लेखी म्हणणे आयुक्तांना दिले. पोषण आहारासाठी निकृष्ट धान्य पुरविले जाते. हे प्रयोगशाळेत अनेकवेळा सिध्द झाले आहे. ठेकेदार निकृष्ट धान्य पुरवतात. पण, त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना होतो. ठेकेदार मात्र नामानिराळा राहतो. त्याच्यापर्यंत कोणी जात नसल्याने तो सुरक्षित राहतो.शाळेत धान्य उतरुन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केवळ तांत्रिक संबंध येतो, अशा कर्मचाऱ्यांबाबत आपली कोणतीही तक्रार नाही. पण, दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन मुलांना चांगला आहार पुरवावा, असेही मेस्त्री यांनी पत्रात म्हटले आहे. पंचायत समिती सदस्या मेस्त्री यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला असून, आपण हे प्रकरण धसास लावण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही मेस्त्री यांनी सांगितले. (प्रतिनिधी)