मेफेड्रोन बंदी मोडणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: July 15, 2015 00:18 IST2015-07-14T21:56:02+5:302015-07-15T00:18:32+5:30
जिल्हा पोलिसांकडून कडक इशारा, माहिती कळवण्याचे आवाहन

मेफेड्रोन बंदी मोडणाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी : मेफेड्रोन ड्रग्जचे राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सेवन केले जात असल्याचे पुढे येत आहे. तसेच त्याचा व्यापार आणि विक्री केली जात असून, याचे वाईट परिणाम समाजावर होत आहेत. याला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेद्वारे मेफेड्रोनचा अमली पदार्थ कायद्यामध्ये समावेश केला असून, सेवन, व्यापार आणि विक्रीला प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीही मेफेड्रोनची विक्री काही समाजविघातक प्रवृत्ती करीत असल्याचा संशय आहे, असे आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मेफेड्रोन हा एम्फेटामाईन आणि कॅथिनोन वर्गातील नार्कोटीक ड्रग्ज आहे. बाजारात तो ड्रोन एमकॅट, व्हाईट मॅजिक व मँव मँव या नावाने ओळखला जातो. तो टॅबलेट अथवा पावडरच्या स्वरुपात येतो. कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये मेफेड्रोन या पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे. २००७ पासून मेफेड्रोन इंटरनेटवर उपलब्ध होते. २००८ मध्ये कायदा व सुव्यवस्था पाहणाऱ्या संस्थांना याची माहिती मिळाली. २०१० च्या सुमारास मेफेड्रोन हा युरोप, इंग्लड या भागात पसरला होता. २००८ मध्ये इस्त्रायलमध्ये सर्वप्रथम यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर स्वीडनने बंदी घातली. २०१० मध्ये सर्व युरोपीयन देशांनी यावर बंदी आणली भारतातही २०१५मध्ये मेफे ड्रोनवर बंदी घालण्यात आली असून, या बंदीचे उल्लंघन करुन सेवन, विक्री केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसानी दिला आहे. (प्रतिनिधी)