‘अॅसिड रेन’च्या अफवेने लांजात पळापळ
By Admin | Updated: April 17, 2015 00:04 IST2015-04-16T23:31:43+5:302015-04-17T00:04:14+5:30
प्रशासनाची धावपळ : रेल्वे प्रशासनाच्या अस्वच्छतेचे कारण उघड

‘अॅसिड रेन’च्या अफवेने लांजात पळापळ
लांजा : तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशनच्या परिसरात ‘केमिकल रेन’ पडल्याची अफवा संपूर्ण लांजात पसरताच प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या अस्वच्छतेमुळेच पडलेल्या पावसाचे पाणी गटारातून वाहात असताना फेसाळले, असा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे.गुरुवारी दुपारी ३ वाजता लांजा तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्याचप्रमाणे विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणीदेखील मुसळधार पाऊस कोसळला. पावसाचे पाणी रेल्वे ट्रकच्या शेजारी असणाऱ्या गटारातून वाहत असताना रेल्वे ट्रॅकवर असणारे रसायन या पाण्यात मिसळल्याने संपूर्ण गटाराच्या पाण्यावर फेसाळेला तवंग तयार झाला. अनेकांनी या गटाराच्या पाण्यावरील फोटो काढून व्हॉटस्अॅपवर पाठवले व विलवडे रेल्वे स्टेशन येथे केमिकलचा पाऊस पडल्याची अफवा उठवली. तत्काळ लांजा तहसीलदार दशरथ चौधरी यांनी तलाठ्यांमार्फत पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यावेळी संपूर्ण गावात अशा प्रकारे कुठेच पाऊस पडला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले व फक्त रेल्वे स्टेशनच्या गटारापुरताच केमिकलचा पाऊस पडला का? असा सवाल केला. रेल्वे स्टेशन येथे असणारी अस्वच्छता रेल्वे थांबल्यानंतर पडणारे रसायन यामुळे आज पडलेल्या पावसामुळे हे रसायन रेल्वे स्थानकाच्या गटारात पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आणि ज्या गटारामध्ये वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यावर पांढरा फेसाळ असा तवंग निर्माण झाला. याचे आश्चर्य येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटले. मात्र, आपल्या स्टेशनच्या अस्वच्छतेमुळे असा प्रकार घडल्याचे त्यांच्या उशिरा लक्षात आले. तोपर्यंत शासकीय यंत्रणेने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने अस्वच्छतेच्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी हा प्रयत्न चालू केला आहे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे ट्रकवरील रसायनयुक्त पाणी गटारातून वाहात आल्याचा फोटो व्हॉटस्अपवरून फिरला आणि अफवा पसरली.
तहसीलदार दशरथ चौधरी यांनीही घेतली घटनास्थळी धाव.
तहसीलदारांनी केला खुलासा.