कारागृहातून पळालेला आरोपी अटकेत

By Admin | Updated: June 30, 2014 00:19 IST2014-06-30T00:12:14+5:302014-06-30T00:19:20+5:30

दापोली पोलिसांची कारवाई : पनवेल रेल्वे स्थानकावर रचला सापळा

The accused escaped from the jail | कारागृहातून पळालेला आरोपी अटकेत

कारागृहातून पळालेला आरोपी अटकेत


दापोली : रत्नागिरीच्या कारागृहातून पळून गेलेला आरोपी किरण मोरे याला दापोली पोलिसांनी मोठ्या शिताफीने पनवेल रेल्वे स्थानकावर जेरबंद केले आहे. आपल्या पत्नीला भेटायला येत असताना पोलिसांनी सापळा लावला व त्याला अटक केली.
घरफोडी, चोरीच्या आरोपाखाली साखरोळी (खेड) येथील आरोपी किरण कृष्णा मोरे (वय २५) व बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या दापोली तालुक्यातील आंबवली येथील रितेश काशिनाथ कदम (२३) यांनी बनावट चावीने आपल्या कोठडीचे कुलूप उघडून अंगावरील चादरीचा दोर तयार करून रत्नागिरी येथील विशेष कारागृहाच्या २५ फूट भिंतीवरून पलायन केले होते. किरण याने दापोली परिसरातच अनेक गुन्हे केले होते. काही महिन्यापूर्वी किरण मोरे याला दापोली पोलीस न्यायालयात आणत असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. त्याने जालगावातील एका मुलीशी लग्नही केले. कारागृहातून पळाल्यानंतर तो पत्नीशी संपर्क ठेवेल म्हणून दापोलीचे पोलीसांनी किरणच्या पत्नीवर पाळत ठेवली होती. ती आपल्या पतीला भेटायला जाणार असल्याची गुप्त माहितीही पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सायंकाळी खेडवरून सुटणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसने ती पनवेलकडे जाण्यास निघाली. त्याच गाडीमध्ये मागील व पुढील डब्यात वेषांतर करून बसलेल्या पोलिसांनी पनवेलपर्यंत पाठलाग केला. पनवेलला थांबल्यानंतर ती गाडीतून उतरली व किरणची वाट पाहत थांबली होती. तिच्या जवळ साध्या वेषातील पोलीसही सापळा रचून बसले होते. काही वेळाने किरण हा प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने येत असतानाच त्याला साध्या वेशातील पोलीस दिसले व तो बचावासाठी पळू लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी म्हसे, पोलीस नाईक उदय भोसले, समेल सुर्वे, पोलीस कॉ. शैलेश सावंतदेसाई, गीता म्हापार्ले, मंगेश शिगवण, स्वप्निल शिवलकर, अनुप पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच सुनील पवार, विक्रम पाटील यांंनी भाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: The accused escaped from the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.