अपघातानं स्मृती हरवली, पण कष्टानं यश गवसलं!

By Admin | Updated: June 19, 2014 01:11 IST2014-06-19T01:08:13+5:302014-06-19T01:11:55+5:30

नीलय अनगोळकर : ‘तो’ परिस्थितीशी झगडला, पण वाकला नाही... एका जिद्दीनं लढणाऱ्या तरूणाची कहाणी

Accidentally lost memory, but hard work succeeded! | अपघातानं स्मृती हरवली, पण कष्टानं यश गवसलं!

अपघातानं स्मृती हरवली, पण कष्टानं यश गवसलं!

मेहरुन नाकाडे / रत्नागिरी
अपघातामध्ये मेंदूला लागलेला जबर मार त्यामुळे हरवणारी स्मृती परंतु शिक्षकवृंदाचे प्रोत्साहन, आईचे पाठबळ यामुळेच कणकवलीच्या नीलय जगदीश अनगोळकर या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.
इयत्ता सहावीमध्ये शाळेत जाताना झालेल्या अपघातात नीलय याच्या मेंदूला जबर मार लागला. एक महिना कोमात असणाऱ्या नीलयला वैद्यकिय उपचारामुळे शुध्द तर आली परंतु स्मृती हरवली. शिवाय हातपाय देखील अपघातामुळे वाकडे झाले. मात्र मुलावर चांगले उपचार व्हावे यासाठी अनगोळकर दांपत्यानी प्रयत्न केले. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या शहरातून मुलावर उपचार घेत ते रत्नागिरीत दाखल झाले. उत्कृष्ट गिटार व तबला वादन करणारा व अभ्यासात प्रचंड हुशार असणाऱ्या नीलयची स्मृती अधेमधे हरवत असे. डॉक्टरांचे मत होते की, तो पूर्ण बरा होईल परंतु त्याला वेळ लागेल. हातात पेनसुध्दा धरता येत नव्हते. अशावेळी त्याला वैद्यकीय उपचाराबरोबर कौन्सिलींग तसेच काही व्हिडीओ गेमव्दारे प्रशिक्षण देण्यात येत होतं. वर्षभरात तो काहीअंशी बरा झाला मात्र सातवीत तो नापास झाला. बरोबरीची सर्व मुले पुढच्या वर्गात आपण मात्र मागच्या वर्गात हे शल्य सारखं टोचत असल्याने नीलय कणकवलीत राहण्यास तयार नव्हता. परिणामी आई वडिलांनी कणकवली सोडून नाशिक व नंतर रत्नागिरी गाठली. जीजीपीएस शाळेत प्रवेश घेतला.
नीलयचा अधूनमधून स्मृती हरवण्याचा प्रकार सुरूच होता. परंतु शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण तसेच शिक्षकवर्गाचे वेळोवेळी मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे नीलय दहावीची परीक्षा पास झाला. वर्गात सोडणे, वर्गातून आणणे दिवसभरात शाळेच्या प्रांगणात थांबून वेळेवर औषधे देणे, यासाठी नीलयची आई धडपडत असे.आठवी व नववीची परीक्षा पास झालेनंतर दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. मध्येच नीलयला निमोनिया झाला, पडल्यामुळे हात पाय फॅक्चर झाले. परंतु आई स्मिता यांनी न डगमगता नीलयची सुश्रूषा सुरू ठेवली. बरा झालेनंतर पुन्हा नीलय शाळेत आल्यावर शिक्षकवृंदानी त्याचेवर प्रचंड मेहनत घेतली.
स्मृती हरवण्याचा प्रकार सुरूच असल्याने शिक्षकांनी निम्मे विषय घेवून आॅक्टोबरला व निम्मे विषय घेवून मार्च मध्ये परीक्षेस नीलय याला बसविण्याचा निर्णय घेतला. त्या पध्दतीने अभ्यास घेणे सुरू ठेवले. याच दरम्यान डॉ. कृष्णा पेवेकर यांनीही निलयचे कौन्सिलींग सुरू ठेवले होते. त्यामुळे आॅक्टोबर मध्ये निम्म्या विषयाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाल्यानंतर शिक्षकवृंदास आनंद झाला. त्यामुळे उर्वरित विषयासाठी मार्चमध्ये नीलयने परीक्षा दिली. त्यातही तो यशस्वी झाला.
जीजीपीएस शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांनी हुशार मुले पास होतात. त्यांचेवर फार कमी मेहनत घ्यावी लागते. मात्र जे विद्यार्थी हुशार आहेत, मात्र एखादे अडचणीत असतील किंवा सामान्य बुध्दीमत्तेचे त्यांचेवर मेहनत घेणे हेच आम्हा शिक्षकवृंदाचे कौशल्य असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आई होण्याचे कर्तव्य पूर्ण केले मात्र यश नीलयचे आहे. रत्नागिरीत आल्यानंतर जीजीपीएसचे मुख्याध्यापक चव्हाण व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास व माझे पाल्यावर घेतलेली मेहनत याबाबत त्यांचे कौतुक करावे, तितके थोडे असल्याचे स्मिता यांनी सांगितले.

Web Title: Accidentally lost memory, but hard work succeeded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.