निवृत्त अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: July 12, 2014 00:33 IST2014-07-12T00:30:30+5:302014-07-12T00:33:41+5:30

वेरळ घाटातील घटना : अज्ञान वाहनाची धडक

Accidental death of retired officer | निवृत्त अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

निवृत्त अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजाराम मनोहर मिरजकर (वय ६२) हे जागीच ठार झाले. दगडावर डोके आदळून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज, शुक्रवारी सकाळी १० वा. हा अपघात घडला. मिरजकर रत्नागिरीतून लांजा येथे त्यांच्या घराची साफसफाई करण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम मनोहर मिरजकर हे मूळचे लांजा येथील रहिवासी आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी गेल्या १५ वर्षांपासून ते रत्नागिरी येथे स्थायिक झाले होते. लांजा येथे शिक्षक व नंतर केंद्रप्रमुख ते शिक्षण विस्तार अधिकारी अशी पदे भूषविल्यानंतर ते ४ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. मात्र, रत्नागिरीतून लांजा येथील घराकडे ते ये जा करीत असत.
लांजा येथील घराची साफसफाई करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी ९ वा. मुलीची प्लेझर (एमएच ०८ एक्स ३१४५) ही दुचाकी घेऊन ते रत्नागिरीहून निघाले होते. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. वेरळ घाट चढून पुढे जाताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, मिरजकर हे मोटारसायकलवरून गटारात फेकले गेले. या गटारातील दगडावर त्यांचे डोके जोरात आदळल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांतील प्रवाशांनी लांजा पोलिसांना घटनेची खबर दिली. लांजा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिरजकर यांना तेथून लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, मिरजकर यांचे आधीच निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
राजाराम मिरजकर हे लांजातील एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच निवृत्त शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अनेक लोकांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची लांजा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Accidental death of retired officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.