कबड्डीपटू कदमचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: July 29, 2014 22:55 IST2014-07-29T22:53:53+5:302014-07-29T22:55:17+5:30
शिवसेना जिल्हाप्रमुखांचा बंधू : एस. टी. बस-खासगी मिनीबसची टक्कर

कबड्डीपटू कदमचा अपघाती मृत्यू
अडरे : चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथे एस. टी. बस व खासगी मिनीबसमध्ये झालेल्या अपघातात चिपळूण येथील कबड्डी खेळाडू चालक संदीप (गोट्या) कदम गंभीर जखमी झाले होते. त्यांचे उपचारादरम्यान काल, सोमवारी मध्यरात्री दोन वाजता निधन झाले.कोहिनूर मित्रमंडळाच्या माध्यमातून वैश्य वसाहत येथे दरवर्षी दहीहंडी उत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धा भरविल्या जातात. या स्पर्धेत संघर्ष मित्रमंडळाच्या संघातून गेली दहा वर्षे गोट्या कदम खेळत होते. जिल्हास्तरावर कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. काल दुपारी २.४५ वाजता गाणे-खडपोलीदरम्यान एस. टी. व खासगी मिनीबस यांच्यामध्ये अपघात होऊन मिनीबसचे चालक कदम हे जखमी झाले होते. प्रथम त्यांना लाईफकेअर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. कदम यांना कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री दोन वाजता त्यांचे निधन झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचे ते भाऊ होते. कदम उत्तम कबड्डीपटू होते. सन २००० पासून त्यांनी स्वतंत्र खासगी गाडी व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असून, सौरभ हा गुरुकुल या कबड्डी संघातून खेळत आहे. सध्या तो अहमदाबाद येथे शिक्षण घेत आहे. दुसरा मुलगा बबलू हा एसपीएम कॉलेजमध्ये शिकत आहे. (वार्ताहर)