हर्षल शिराेडकर /खेड : नगर परिषद निवडणूक पुढील काही कालावधीत होण्याची शक्यता असल्याने खेडमध्ये दलबदलू राजकारणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांत पक्ष प्रवेशांचे कार्यक्रम वाढले असल्याचे दिसून येत आहे. या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. नगर परिषद निवडणूक उमेदवारीवर डोळा ठेवून पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवून पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.
नगर परिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल याचा अभ्यास करून राजकीय पक्षाचे नेते कुणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी करू लागले आहेत. ज्यांना या निवडणुकीत १०० टक्के उमेदवारी मिळणार याची खात्री आहे ते पदाधिकारी पक्षासोबत आहेत. परंतु, ज्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री नाही अशा पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर करण्यात वेग घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत खेड शहरातील अन्य पक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. जे पदाधिकारी अन्य पक्षातून शिवसेनेत दाखल होत आहेत त्यामध्ये काही जणांनी यापूर्वी आपापल्या पक्षाचे नगरसेवक पद उपभोगलेले आहे. मात्र या वेळी पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने किंवा मतदारांचा बदललेला कल तसेच अन्य काही स्थानिक राजकीय परिस्थिती ओळखून शिवबंधन हाती बांधत आपली उमेदवारी निश्चित करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि खेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. चिखले यांच्या शिवसेना प्रवेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजकीय धक्का बसला तर शहर शिवसेनेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आपल्याला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नसल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे चिकणे यांनी म्हटले आहे. मात्र, राजकीय समीक्षकांना हे कारण पटणारे नाही.
गेल्या निवडणुकीत चिकणे यांचा पराभव झाल्याने त्यांना या वेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी हातात शिवबंधन बांधल्याचे बोलले जात आहे. राजकीय समीक्षकांनी काढलेला हा निष्कर्ष किती खरा आणि किती खोटा हे येणारा काळ ठरवेल.