रेल्वे स्थानकात लिफ्टचा गैरवापर
By Admin | Updated: December 11, 2014 23:55 IST2014-12-11T21:34:08+5:302014-12-11T23:55:17+5:30
उद्देश धुळीला : सुरक्षारक्षकच नसल्याने प्रवाशांना मोकळे रान

रेल्वे स्थानकात लिफ्टचा गैरवापर
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर ज्या कारणासाठी दोन वर्षांपूर्वी लिफ्ट उभारण्यात आली तो उद्देशच साफ धुळीला मिळविला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या लिफ्टसाठी कार्यरत असलेल्या रेल्वेच्या दोन सुरक्षारक्षकांनाही हटविण्यात आले आहे. त्यामुळे ही लिफ्ट म्हणजे ‘आओ जाओ लिफ्ट तुम्हारी’ अशी स्थिती निर्माण झाली असून, वरिष्ठ व्यक्ती, अपंग व गर्भवती महिलांना वालीच उरलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म हे खोल भागात असल्याने जिन्याने जा-ये करणे वृध्द, अपंग व गर्भवती महिलांना जिकिरीचे जात होते. त्यांची सोय व्हावी, त्यांना सुविधा मिळावी म्हणून खरेतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावरील भागातून प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जाण्यासाठी काही लाख रुपये खर्च करून लिफ्ट उभारण्यात आली. पहिल्या दिड वर्षांच्या काळात या लिफ्टच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन शिफ्टमध्ये दोन सुरक्षारक्षक काम करीत होते. त्यावेळी वयोवृध्द, गर्भवती महिला व अपंगांना या लिफ्टमधून चांगली सेवा मिळत होती.
परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या लिफ्टला कोणी वालीच राहिलेला नाही. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा या उक्तीप्रमाणे आओ जाओ लिफ्ट तुम्हारी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या लिफ्टचा कोणीही वापर करू लागले आहे आणि विशेष म्हणजे यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने सामान्य प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या लिफ्टचा वापर कोणीही कसाही करीत असून रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी तसेच वडापाव व अन्य खाद्यविक्रेतेही या लिफ्टचा सातत्याने वापर करताना दिसून येत आहेत. बेबंद वापरामुळे ज्यांच्यासाठी ही सुविधा निर्माण केली त्यांना त्याचा लाभच होताना दिसत नाही. त्याबाबत प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)
तो फलक तरी हटवावा...
अपंग, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट असा मोठा फलक रेल्वे स्थानकावर लिफ्टजवळ लावण्यात आला आहे. त्यामुळे या लिफ्टचा वापर त्याच व्यक्तींसाठी व त्यांना मदत करणाऱ्या, त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींसाठी करायला हवा, हे स्पष्ट आहे. मात्र त्याप्रमाणे या लिफ्टचा वापर होत नसून ही लिफ्ट आता सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे याबाबत रेल्वे प्रशासन काही दाद फिर्याद घेणार नसेल तर याबाबत लावण्यात आलेले फलक तरी हटवावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.