सरकारच्या तिजोरीत १० कोटींची भर
By Admin | Updated: September 27, 2015 00:45 IST2015-09-27T00:43:07+5:302015-09-27T00:45:55+5:30
गौण खनिज वसुली : वसुलीमध्ये मंडणगड तालुका अव्वल

सरकारच्या तिजोरीत १० कोटींची भर
रत्नागिरी : गौण खनिज बंदी उठवण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसूलातही वाढ झाली आहे. खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज वसुलीपोटी आॅगस्टअखेर तब्बल १० कोटी ४७ लाख इतकी वसुली करून जिल्ह्याच्या तिजोरीत भर टाकली आहे.
जिल्हा खनिकर्म विभागाला गौण खनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्यासाठी एकूण ३६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पाच उपविभाग आणि तहसील स्तरावरही उद्दिष्ट देण्यात आल्याने जिल्ह्यासाठी यावर्षी ४६ कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचा मानस जिल्हा कार्यालयाने ठेवला आहे.
एप्रिल ते आॅगस्ट २०१५ या पाच महिन्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी केलेल्या वसुलीत मंडणगड तालुक्याने अव्वल स्थान राखले आहे. (५३ लाख १८ हजार रूपये), त्याखालोखाल वसुली खेड तालुक्याची झाली आहे. सर्वात कमी वसुली राजापूर (७ लाख २२ हजार), संगमेश्वर (१४ लाख २५ हजार), लांजा (१४ लाख १९ हजार) इतकी झाली आहे.
उपविभागात राजापूरने बाजी मारली असून, १ कोटी ६४ लाखांची वसुली केली आहे. त्याखालोखाल खेड उपविभागाची वसुली ४६ लाख रूपये इतकी झाली आहे. गौण खनिजांवरील बंदी उठल्यानंतर सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील राजापूर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली या पाच उपविभागांनी तसेच नऊ तहसील कार्यालयांनी मिळून आॅगस्टअखेर एकूण १० कोटी ४६ लाख ९८ हजार इतकी वसुली केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही धडक कामगिरी करत आॅगस्टअखेर ४ कोटी ४६ लाख ५४ हजार एवढी वसुली केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास सात महिने शिल्लक असल्याने या कालावधीत उद्दिष्टापेक्षाही अधिक वसुली करण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)