महिला उमेदवाराचे अपहरण, सुटका
By Admin | Updated: August 13, 2015 00:25 IST2015-08-13T00:25:23+5:302015-08-13T00:25:23+5:30
मासू ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूक स्थगित

महिला उमेदवाराचे अपहरण, सुटका
गुहागर : मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या महिला उमेदवाराचे चार तरुणांनी अपहरण केले होते. शेतामध्ये काम करताना त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद त्या महिला उमेदवाराच्या सासू सुभद्रा महादेव मास्कर (वय ६०) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ११) दुपारी एक वाजता घडली होती. दरम्यान ही महिला बुधवारी सायंकाळी घरी परतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मासू ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूक स्थगित
बुधवारी सरपंच व उपसरपंच पदांसाठी दोन अर्ज भरले. मात्र, सातपैकी गाव पॅनेलचे अपहरण झालेल्या एक व अन्य तीन सदस्य उपस्थित न राहिल्याने आजची निवड स्थगित ठेवून २४ तासांच्या आत आज, गुरुवारी सरपंचपदासाठी निवड घोषित करण्यात येईल, असे नायब तहसीलदार जंगम यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून कृषी अधिकारी गडदे काम पाहत आहेत.