देवरुख : पुणे येथे शिक्षणासाठी असलेल्या २५ वर्षीय तरुणाने गावी येताच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वांद्री-कुणबीवाडी (ता. संगमेश्वर) येथे साेमवारी घडली. प्रथमेश दत्ताराम सनगरे असे त्याचे नाव असून, शिक्षण आणि नाेकरीच्या तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचे पाेलिसांनी सांगितले.प्रथमेश हा पुणे येथे अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. तो सोमवारी वांद्री या त्याच्या गावी आला होता. त्याने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नाही ही संधी साधून घरात नायलॉनच्या साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलिस हवालदार सासवे, कॉन्स्टेबल लोखंडे, चालक सचिन जाधव हे घटनास्थळी पोहाेचले. यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. या चिट्ठीत शिक्षण घेतलेले असताना नोकरी नसल्याने जीवन यात्रा संपवत असल्याचे लिहिले आहे.प्रथमेश याच्या मृतदेहाचे विच्छेदन संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संगमेश्वर पोलिस स्थानकात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश शेलार करीत आहेत.
कुटुंबाची जबाबदारी पेलणाराहरहुन्नरी, मनमिळाऊ वृत्ती आणि सदैव हास्य स्मित चेहऱ्याचा अशी प्रथमेशची ओळख हाेती. कुटुंबाची जबाबदारी स्वतः पेलण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच त्याने आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.