राजापूर : राजापूर तालुका ‘नैसर्गिक आपत्ती निवारण’ या सोशल मीडिया ग्रुपवर कशेळी (ता. राजापूर) येथे बोट उलटल्याची काही घटना घडली आहे का? असा संदेश साेमवारी सकाळी टाकण्यात आला हाेता. हा संदेश पाहताच नाटे पाेलिसांनी कशेळी येथे धाव घेत खात्री केली. त्यावेळी असा काेणताही प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट झाले.बाेट बुडाल्याचा संदेश वाचून नाटे सागरी पोलिस स्थानकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी झटपट हालचाल केली. आपल्या कार्यक्षेत्रातील सागवे येथे जात असतानाच त्यांनी गाडी वळवून थेट कशेळीच्या दिशेने धाव घेतली. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण पोलिस यंत्रणा तसेच कशेळीचे पोलिस पाटील प्रमोद आणि राजन आगवेकर यांना तातडीने माहिती दिली.प्रमोद वाघ, प्रमोद सुतार, राजन आगवेकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल इंगळे व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कशेळी जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहणी करून बोट मालकांकडे चौकशी केली. सुदैवाने अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नाटे पोलिसांची तत्परता, कशेळी पोलिस पाटलांची जागरूकता आणि पोलिसांनी झपाट्याने केलेल्या कारवाईचे काैतुक करण्यात येत आहे.
Ratnagiri: समुद्रात बोट उलटल्याचा मॅसेज आला, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:42 IST