रत्नागिरी : मासेमारी करताना समुद्राला आलेल्या उधाणामुळे पाण्यात पडून एकाच्या जीवावर बेतल्याचा प्रसंग बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे घडला. सुदैवाने हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या वेळीच लक्षात आल्याने या व्यक्तीला वाचविण्यात यश आले. रहिम शेख असे या व्यक्तीचे नाव असून, ते पुण्यातील राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे.पावसाळी हंगामामुळे सध्या खाेल समुद्रातील मासेमारी बंद आहे. त्यामुळे अनेक जण मासे गरविण्यासाठी समुद्रकाठी जात आहेत. रहिम शेख हे बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला आपल्या मुलासोबत रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या बंदर येथील भारतीय शिपियार्ड बोलाडजवळ मासेमारी करण्यासाठी गेले हाेते. समुद्राला प्रचंड उधाण आलेले असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना पुढे न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, ताे न ऐकता ते मासेमारीसाठी पुढे गेले. मासेमारी करत असताना अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेच्या तडाख्याने रहिम शेख समुद्रात पडले.
सुदैवाने समुद्राला भरती असल्याने लाटेबराेबर ते किनाऱ्यावर येऊन खडकावर आदळले. हा प्रकार तेथीलच स्थानिक ग्रामस्थ अमित सावंत, अमर पवार, किरण शिंदे आणि अवधूत चव्हाण यांनी पाहिला आणि ते तत्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी रहिम शेख यांना समुद्रातून बाहेर काढले. ग्रामस्थांच्या या समयसूचकतेमुळे रहिम शेख यांचा जीव वाचला.
ग्रामस्थांच्या सूचनेकडे दुर्लक्षकाही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कापडगाव येथील एका तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाला होता. स्थानिक लोक धोक्याची सूचना देत असतानाही अनेकदा पर्यटक किंवा नागरिक दुर्लक्ष करतात, त्यामुळे अशा दुर्घटना घडतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.