शाळा प्रवासासाठी जिल्ह्यातील ९७ विद्यार्थ्यांना मिळणार भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST2021-04-10T04:31:01+5:302021-04-10T04:31:01+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत घरापासून शाळेचे अंतर जास्त असल्यास ...

शाळा प्रवासासाठी जिल्ह्यातील ९७ विद्यार्थ्यांना मिळणार भत्ता
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत घरापासून शाळेचे अंतर जास्त असल्यास विद्यार्थ्यांना दरमहा तीनशे रुपये प्रवास भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येतो. यावर्षी कोरोनामुळे जूनपासून ऑनलाइन अध्यापन सुरू होते. पाचवी ते आठवीपर्यंत शाळा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ विद्यार्थ्यांना फेब्रुवारी व मार्चचा प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र, अद्याप जिल्हा परिषदेकडे शासनाकडून अनुदान प्राप्त नसल्याने तूर्तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना घरापासून शाळेचे अंतर एक ते तीन किलो मीटरपेक्षा जास्त असेल व जवळपास शाळा नसेल तर दरमहा तीनशे रुपये प्रमाणे प्रवास भत्ता देण्यात येतो. कोरोनामुळे जूनपासून ऑनलाइन अध्यापन सुरू होते. जानेवारीला पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. मात्र, पालकांनी अंदाज घेत मुलांना शाळेत पाठविण्यास प्रारंभ केला. एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा होण्यापूर्वीच कोरोनामुळे परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे परीक्षा न देताच विद्यार्थी पास झाले. केवळ दोन महिनेच विद्यार्थी शाळेत अध्यापनासाठी उपस्थित राहिले. प्रवास भत्त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के असणे अनिवार्य आहे. दोन महिन्यांचे प्रत्येकी सहाशे प्रमाणे ९७ विद्यार्थ्यांना ५८ हजार २०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
- प्रवास भत्त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती पन्नास टक्के असणे आवश्यक आहे. शाळा सुरू असेल व नियमानुसार उपस्थिती असेल तरच अनुदान देण्यात यावे, अशा सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
- शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सूचना केल्यानंतर दि.२७ जानेवारीपासून प्रत्यक्ष अध्यापन शाळांमध्ये सुरू झाले. दि.१ एप्रिलपर्यंत शाळा सुरू होत्या.
- दोनच महिने विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती राहिली. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांचा प्रवास भत्ता मुलांना दिला जाणार आहे.
शासनाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना प्रवास भत्त्यासाठी जिल्ह्यातील शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील २५७४ शाळांमधून ९७ विद्यार्थी अनुदानासाठी प्राप्त ठरले आहेत. फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांसाठी प्रवास भत्ता दिला जाणार आहे. दोन महिन्याचे सहाशे रुपये याप्रमाणे ५८ हजार २०० रुपये अनुदान जिल्ह्यास प्राप्त होणार आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त होताच तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. यावर्षी कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन असल्याने दोन महिन्यांचा प्रवासभत्ता प्राप्त होणार आहे.
-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी