मंडणगडात पाच दिवसांचे ९५ तपासणी अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:47+5:302021-05-13T04:31:47+5:30
मंडणगड : स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा फटका मंडणगड तालुक्यातील लोकांना बसला आहे. ७ मे ते १२ मे या ...

मंडणगडात पाच दिवसांचे ९५ तपासणी अहवाल प्रलंबित
मंडणगड : स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा फटका मंडणगड तालुक्यातील लोकांना बसला आहे. ७ मे ते १२ मे या पाच दिवसांच्या कालावधीतील ९५ लोकांच्या आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
लॉकडाऊनमुळे सार्वजनिक व्यवस्था बंद आहे. मंडणगड तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी शुक्रवार व रविवार या दोन दिवशीच गाडी असल्याने ७ रोजी ७५ व ९ रोजी २० असे ९५ स्वॅब चिपळूण येथे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे़ मात्र, १२ मेपर्यंत त्यांचा अहवाल स्थानिक यंत्रणेला मिळालेला नाही. तपासणीसाठी नमुने घेण्यात आलेल्या लोकांवर नेमके काय उपचार करायचे, त्यांना रुग्णालयात ठेवावे की आयसोलेशनमध्ये ठेवावे, असे अनेक प्रश्न स्थानिक आरोग्य यंत्रणेला पडले आहेत. असे लोक जर बाहेर फिरत राहिले तर त्यातून संसर्गाचा धोका आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिपळूण कामथे येथे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून स्वॅब तपासणी होत असल्याने उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्वॅब कामथे रुग्णालयात तपासणीकरिता पाठविण्यात येत आहेत. मात्र, या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दिवसातून शंभर ते दीडशे तपासण्या होत असल्याने मंडणगड तालुक्याचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रवास व कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांचे अहवालही आरोग्य विभागाकडे सक्षम व्यवस्था नसल्याने प्रलंबित आहेत. कोरोनाचे लक्षण नसताना कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांकडून किंवा कोरोनाची शक्यता वाटलेल्या लोकांकडून आरटीपीसीआर तपासणीसाठी शुल्क आकारले जाते. मात्र, आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत अहवाल पोहोचण्यासाठी लागणारा विलंब व तपासणीसाठी लागणारा वेळ यामुळे कोरोना नियमावलीचा फज्जा उडत आहे.
रुग्णांना क्वाॅरंटाईन करण्याबाबतच्या निकषांच्या अंमलबजावणीतही स्थानिक पातळीवर गोंधळ आहे. शुल्क भरूनही इतका वेळ जात असल्यास सक्षम खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना तपासणीची व्यवस्था सुरू करण्यास आरोग्य यंत्रणेने अनुमती द्यावी, अशी मागणी या अनुषंगाने केली जात आहे. एप्रिल व मे महिन्यात तालुक्यात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मे महिन्यात लसीकरण अभियानाला गती आली आहे. कोरोना तपासण्या मात्र आजही मर्यादित आहेत.