कापसाळ येथे ९० हजारांची दारु जप्त
By Admin | Updated: March 25, 2015 00:44 IST2015-03-24T21:38:56+5:302015-03-25T00:44:47+5:30
दोघांना अटक : पावणे चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कापसाळ येथे ९० हजारांची दारु जप्त
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे गोवा बनावटीची दारु व कच्चा माल घेऊन जाणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाच्या पथकाने धडक कारवाई करुन २४ लाख ६३ हजार ७२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री १ वाजता करण्यात आली. यामध्ये ९० हजार ७२० रुपयांच्या गोवा दारुसह दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही सर्वात मोठी कारवाई असून कोल्हापूरच्या विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या आदेशानुसार चिपळूण व खेड विभागाच्या सहकार्याने ही धडक कारवाई करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना कापसाळ येथे मध्यरात्री १ वाजता गोवा दिशेकडून येणारा आयशर ट्रक उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला दिसला. या वाहनाची थांबवून तपासणी करण्यात आली असता यामध्ये कोकम, सुपारी मालाच्या गोण्या भरलेल्या होत्या. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अधिक तपासणी केली असता कागदी बॉक्समध्ये गोवा राज्य बनावटीच्या विदेशी मद्याच्या रॉयल स्टँग, ओल्ड बिन, मॅकडॉल नं.१, इम्पेरियल ब्ल्यू व हेवर्डस व्हिस्की आदी १५ बॉक्सेसचा साठा आढळून आला.याप्रकरणी ट्रकचालक उत्तम दत्ताराम पडवळ (६० देवगे, सावंतवाडी), तन्वीर इक्बाल शेख (२५ माजगाव) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १० लाख रूपये किंमतीचा आयशर ट्रक, १३ लाख ७३ हजार रूपये किंमतीचा कच्चा माल, ९० हजार ७२० रूपये किंमतीची गोवा बनावटी दारूसह २४ लाख ६३ हजार ७२० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, चिपळूणचे निरीक्षक किशोर वायंगणकर, खेडचे निरीक्षक दीपक वायंगणकर, चिपळूणचे उपनिरीक्षक शंकर जाधव, खेडचे उपनिरीक्षक किरण बिरादार यांच्यासह कर्मचारी भालेकर, शेख, बर्वे, वसावे, विचारे, वड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.उत्पादन शुल्क विभागाच्या या धडक कारवाईमुळे महामार्गावरून करून बेकायदा दारु वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)
राज्य उत्पादन शुल्क चिपळूण, खेड विभागाची धडक कारवाई.
१० लाख किंमतीचा आयशर ट्रक, १३ लाख ७३ हजार रुपयांचा कच्चा माल हस्तगत.
अवैध वाहतूक, वाहनांची तपासणी करताना गुन्हा उघड.
उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने धाबे दणाणले.