चिपळूण, खेडमधील ९० टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST2021-07-31T04:32:52+5:302021-07-31T04:32:52+5:30

रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले ...

90% Punchnama completed in Chiplun, Khed | चिपळूण, खेडमधील ९० टक्के पंचनामे पूर्ण

चिपळूण, खेडमधील ९० टक्के पंचनामे पूर्ण

रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. गेल्या १ जूनपासून जिल्ह्यात सरासरी २५९९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अडीच महिन्यांची सरासरी पावसाने जवळपास पावणेदोन महिन्यांतच पूर्ण केली आहे.

गेल्या आठवड्यात सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती, मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सर्व नद्यांची पाणीपातळी धोका पातळीपेक्षा कमी झाली आहे. गेल्या २२ आणि २३ जुलैला चिपळूण आणि खेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्ववत होत आहे. दोन्ही तालुक्यांतील ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत.

पुरामध्ये एकूण ३२ व्यक्ती मरण पावल्या असून एक व्यक्ती बेपत्ता आहे. ३३१ जनावरे आणि ११४५ पक्षी पशुधन मृत झाले आहे. आतापर्यंत पुरामुळे सुमारे २ हजार ३३७ घरांचे, १५४ गोठ्यांचे अंशत: नुकसान झाले आहे. दरड क्षेत्रातील आणि पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी चिपळूण येथे १० ठिकाणी, तर खेड येथे १७ ठिकाणी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. निवारा केंद्रांमध्ये ११२५ नागरिक दाखल झाले होते. २१ ठिकाणी ६१५ नागरिक निवारा केंद्रात दाखल आहेत. निवारा केंद्राच्या ठिकाणी दाखल झालेल्या नागरिकांना भोजन, पाणी, बिस्किट, ब्लँकेट्स, सतरंज्या, मेणबत्त्या, काडेपेट्या आदी जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या आहेत.

पूर ओसरल्यानंतर जेसीबी, डंपर, ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वच्छता केली जात आहे. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. ठाणे आणि मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी साफसफाई करण्यासाठी कार्यरत आहेत. निर्जंतुकीकरण करण्यासाठी अन्य पालिकांची पथके कार्यान्वित आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी चिपळूण आणि खेड येथे टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाला पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यात २२ पथके कार्यरत आहेत. १५ पथके शहरी भागात, तर ७ पथके ग्रामीण भागामध्ये आहेत. खेड तालुक्याात ८ वैद्यकीय पथके कार्यरत असून त्यापैकी ५ पथके शहरी भागात, तर ३ पथके ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. चिपळूण तालुक्या्त २३ आणि खेड तालुक्यात ४ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पूर ओसरल्यानंतर साथीचे रोग पसरू नयेत, म्हणून आरोग्य विभागाची पथके शहर आणि ग्रामीण भागात कार्यरत आहेत. मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार पसरू नयेत, म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील नागरिकांना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बँक खात्याचा तपशील असा- रत्नागिरी डिस्ट्रिक्ट रिलीफ फंड (खाते क्रमांक १४६३१०११००१८४४३, बँक ऑफ इंडिया, मारुती मंदिर शाखा, आयएफएससी बीकेआयडी०००१४६३). उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर (९४२३०३४०७०, ९३०७४४९०२१) यांच्याशी संपर्क करावा, असे कळविले आहे.

Web Title: 90% Punchnama completed in Chiplun, Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.