९७२ मुंबईकरांना आरोग्याचा डोस
By Admin | Updated: September 11, 2014 00:11 IST2014-09-10T22:38:42+5:302014-09-11T00:11:25+5:30
आरोग्य विभाग : दीड लाख प्रवाशांची तपासणी

९७२ मुंबईकरांना आरोग्याचा डोस
रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये गेल्या बारा दिवसांत जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य पथकांनी १ लाख ४६ हजार ७४८ चाकरमान्यांची तपासणी केली. त्यामध्ये ९७२ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असून, मलेरियाचे एकूण १७४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
गणेशोत्सवासाठी मुंबईहून बहुसंख्य चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे जिल्ह्यात कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, डेंग्यू या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात एस. टी., रेल्वे स्थानके आदी ठिकाणी आठ आरोग्य पथके तसेच महामार्गावर १७ ठिकाणी वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली होती. जिल्ह्यात दि. २५ ते आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली होती.
या आरोग्य पथकांकडून चाकरमान्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत १ लाख ४६ हजार ७४८ चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मलेरियाच्या १७४ संशयित रुग्णांचे रक्त नमुनेही घेण्यात आले आहेत.
रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ९७२ चाकरमान्यांवर पथकाकडून औषधोपचार करण्यात आले. मलेरियाच्या संशयित रुग्ण आणि औषधोपचार करण्यात आलेल्या रुग्णांचा घरचा पत्ता घेऊन आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांच्या गावच्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्यास कळविण्यात आले होते़ त्यामुळे त्या चाकरमानी असलेल्या रुग्णाच्या राहत्या घरीही औषधोपचार करण्याची काळजी आरोग्य विभागाकडून घेण्यात आली होती़ (शहर वार्ताहर)
तपासणी केंद्रांचीही स्थापना
१७४ मलेरियाचे संशयित रुग्ण सापडले.
९७२ मुंबईकरांवर प्राथमिक उपचार.
महामार्ग, रेल्वे-बस स्थानकावर तपासणी केंद्रांची स्थापना.
१२ दिवस आरोग्य विभागाकडून तपासणी.
डेंग्यू, काविळ, गॅस्ट्रो, स्वाइन फ्लूची शक्यता ध्यानी घेऊन आरोग्य विभागाचा उपक्रम.
आरोग्य विभागाची सतर्कता.