९६ पर्यटन स्थळांच्या वाट्याला अच्छे दिन
By Admin | Updated: September 19, 2015 23:54 IST2015-09-19T23:53:59+5:302015-09-19T23:54:15+5:30
पर्यटन विकास : ६७०.५७ कोटींचा आराखडा शासनाकडे

९६ पर्यटन स्थळांच्या वाट्याला अच्छे दिन
रत्नागिरी : जिल्ह्यातील ९६ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडून ६७०.५७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक २२ पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रीय पुरूषांची स्मारके तसेच गडकिल्ले, मंदिरे जीर्ण झालेली आहेत. स्थळांना ऊर्जितावस्था मिळावी तसेच ही स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास पर्यटकांचा ओघ रत्नागिरी जिल्ह्याकडे वाढेल, या हेतूने ही पर्यटनस्थळे त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता जिल्ह्यातील या ९६ विविध स्थळांच्या विकासासाठी ६७०.५७ कोटी रूपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. ही स्मारके, निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक ठेवा, सागरी सौंदर्य (बीच), धर्मस्थळे, धबधबे, उद्याने, गरम पाण्याचे कुंड आदी पर्यटनस्थळे विकसित झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील विविध महत्वाची ही ९६ पर्यटनस्थळे त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सर्वाधिक स्थळे रत्नागिरी तालुक्यात २२ असून, त्यासाठी प्रस्तावीत रक्कम १२७.४५ कोटी रूपये इतकी आहे. तसेच एकूण ६७०.५७ कोटींपैकी पहिल्या टप्प्यात ४२७.६९ कोटी रूपये तर दुसऱ्या टप्प्यात २४२.८८ कोटी रूपये मिळणे अपेक्षित आहे.
हा आराखडा आता शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून या स्थळांना प्राधान्यक्रम ठरवून देण्यात येणार असून, त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर या पर्यटनस्थळांच्या विकासाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या दुर्लक्षित राहिलेल्या पर्यटनस्थळांना उर्जितावस्था प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)
सर्वाधिक स्थळे रत्नागिरीत
या आराखड्यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक २२ पर्यटनस्थळांचा विचार करण्यात आला आहे. त्याखालोखाल चिपळूण (१६), दापोली (१३), संगमेश्वर (११), राजापूर (१०), खेड (९), गुहागर (८), मंडणगड (४), लांजा (३) येथील स्थळेही विकसीत करण्यात येणार आहेत.
शासनाच्या कोकण पॅकेज अंतर्गत विशेष घटक योजनेतून आंबडवे (ता. मंडणगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी व शिल्पसृष्टीसाठी ५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५ स्मारके, २२ गडकिल्ले, ३८ मंदिरे, १० समुद्रकिनारे, ३ धबधबे, २ गरम पाण्याची कुंडे, एक उद्यान, तसेच अन्य पर्यटनस्थळांचा समावेश आहे. देवडे (ता. संगमेश्वर) या निसर्गरम्य गावाचा समावेश स्वतंत्ररित्या ‘इको टुरिझम’ मध्ये करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे येथील त्यांचे घर, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे कोट (लांजा) येथील घर, लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरीतील जन्मस्थळ तसेच विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बंदिवान करून ठेवण्यात आले होते ती खोली, मालगुंड येथील कवी केशवसुतांचे स्मारक तसेच रत्नागिरीत बाळासाहेब ठाकरे उद्यान आदींचा समावेश आहे.