जिल्ह्यात ९४ मुख्याध्यापक अतिरिक्त
By Admin | Updated: September 11, 2015 00:46 IST2015-09-11T00:44:26+5:302015-09-11T00:46:14+5:30
शिक्षणाचा अधिकार : कमी पटसंख्येच्या शाळांचे मुख्याध्यापकपद होणार रद्द

जिल्ह्यात ९४ मुख्याध्यापक अतिरिक्त
आनंद त्रिपाठी वाटूळ
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित इत्यादी सर्व) शाळांमधील संरचनात्मक बदल आणि संचमान्यतेच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २८ आॅगस्ट २०१५ च्या परिपत्रकानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ९४ शाळांमधील मुख्याध्यापकांना त्यांचे पद गमावण्याची वेळ आली आहे.
माध्यमिक शाळा (नववी, दहावी)मध्ये १००पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास मुख्याध्यापकांचे पद अनुज्ञेय असेल. सध्या अस्तित्त्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नववी, दहावीमध्ये ९०पेक्षा कमी झाल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक पद रद्द होणार असल्याचे नव्याने जाहीर झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ३८८ माध्यमिक शाळांपैकी ९४ माध्यमिक शाळांना मुख्याध्यापकांशिवाय शाळेचे कामकाज हाकावे लागणार आहे. या ९४ शाळांमध्ये सध्या कित्येक वर्षांपासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे मुख्याध्यापक अतिरिक्त ठरल्याने त्यांना सहाय्यक शिक्षक पदावर काम करावे लागणार आहे. हा शासन निर्णय येण्यापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळेमध्ये समायोजित करावे, त्या व्यवस्थापनाची दुसरी शाळा नसल्यास तालुक्यात वा पूर्ण जिल्ह्यात जिथे जागा रिक्त असेल तिथे समायोजित करावे, असा स्पष्ट उल्लेख परिपत्रकामध्ये आहे. मुख्याध्यापक पदावरून सहायक शिक्षकाच्या पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन संरक्षण देण्यात आले असून, त्यांना मुख्याध्यापक पदाचेच वेतन मिळणार आहे.