अडीच महिन्यांत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:54+5:302021-08-15T04:31:54+5:30
रत्नागिरी : सुरूवातीपासून जोर धरलेल्या पावसामुळे गेल्या अडीच महिन्यांत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला आहे. जून आणि जुलै महिन्याची ...

अडीच महिन्यांत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस
रत्नागिरी : सुरूवातीपासून जोर धरलेल्या पावसामुळे गेल्या अडीच महिन्यांत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला आहे. जून आणि जुलै महिन्याची सरासरीही यंदाच्या पावसाने ओलांडली आहे. सध्या पाऊस सरींवर असला तरीही येणारी सर जोरदार येत असल्याने पावसाचा जोर कायम आहे.
गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेने कमी होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर विविध वादळांमुळे अगदी डिसेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम बऱ्यापैकी लांबल्याने पाणीटंचाई उशिरा सुरू झाली होती.
यंदा मात्र १६ मे रोजी झालेल्या ताैक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने पुढे आठवडाभर पाऊस राहिला. त्यानंतरही १ जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली. अधूनमधून विश्रांती असली तरीही दुसऱ्या आठवड्यातही पावसाचा जोर वाढला होता. मात्र, या काळातही जोरदार पडलेल्या पावसामुळे जून महिन्यातील सरासरीही पावसाने ओलांडली.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ३३६४.२२ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. जून महिन्यात ८१८, जुलै महिन्यात १२८६, ऑगस्ट महिन्यात ८२९ आणि सप्टेंबर महिन्यात ४३१ मिलिमीटर इतका साधारणपणे पाऊस पडतो. यंदा जून महिन्यात ९११ मिलिमीटर पाऊस झाला आणि जुलै महिन्यात १,७२१ मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजे जूनमध्ये ९३ आणि जुलै महिन्यात ४३५ मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे. २० ते २२ जुलै या कालावधीत तर जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस २,८४९ मिलिमीटर इतका असून, सरासरीच्या ८४ टक्के इतका झाला आहे तर गतवर्षीच्या तुलनेने ५९३ मिलिमीटर अधिक झाला आहे.
ऑगस्ट महिन्यात आता ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. श्रावणसरी सुरू झाल्या असल्या तरी अजूनही पाऊस जोरदार सरींनी पडत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याची सरासरीही पाऊस ओलांडण्याची शक्यता वाटू लागली आहे. सध्या या पावसामुळे वातावरणात काहीअंशी गारवा जाणवत आहे.