जिल्हा बॅँक निवडणूक २१ जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज

By Admin | Updated: April 9, 2015 00:01 IST2015-04-08T23:32:19+5:302015-04-09T00:01:47+5:30

सेना-भाजप पुन्हा आमने-सामने

80 nomination papers for district election in 21 constituencies | जिल्हा बॅँक निवडणूक २१ जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज

जिल्हा बॅँक निवडणूक २१ जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज

रत्नागिरी : गेले काही दिवस गाजावाजा होत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी संचालकांच्या २१ जागांकरिता ८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सहकार पॅनेलला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने शिवसंकल्प पॅनेलच्या माध्यमातून सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात राष्ट्रवादी तसेच काँग्रेस उमेदवारांचाही समावेश आहे.
जिल्हा बॅँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे हे आग्रही होते. जिल्हा बॅँक ही शेतकऱ्यांची बॅँक असून, यात राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व पक्षांच्या सहकार क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचा समावेश करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी शिवसेनेला दोन जागा देऊ केल्या होत्या. मात्र शिवसेनेला ८ जागा हव्या होत्या. याबाबतची चर्चा निष्फळ झाल्याने सेनेने सर्व २१ जागांवर आपल्या पॅनेलचे उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेला पूर्ण जागांवर उभे करण्यासाठी उमेदवारच न मिळाल्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काहीजणांना उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)

सेना-भाजप पुन्हा आमने-सामने
राज्याच्या सत्तेत शिवसेना सहभागी असली तरी जिल्ह्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सेना-भाजप यांचे सख्य नाही. जिल्हा बॅँकेतही आता सहकार पॅनेलमध्ये भाजपचे उमेदवार असल्याने शिवसंकल्प पॅनेलशी सामना करताना शिवसेना-भाजप आमने-सामने येणार आहे.


सिंधुदुर्गात १२५ अर्ज
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १९ जागांसाठी एकूण १२५ अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व सेना-भाजप यांच्या महायुतीमधील दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे. जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता.

Web Title: 80 nomination papers for district election in 21 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.