७९व्या वर्षातही त्यांना शेतीचीच ओढ
By Admin | Updated: July 8, 2014 00:17 IST2014-07-07T23:32:43+5:302014-07-08T00:17:42+5:30
शेतीवरचे आपले प्रेम जराही कमी केलेले नाही

७९व्या वर्षातही त्यांना शेतीचीच ओढ
समीर चांदोरकर ल्ल सापुचेतळे
माजी पोलीसपाटील बाबल्या महादेव बनकर यांनी वयाच्या ७९व्या वर्षी शेतीवरचे आपले प्रेम जराही कमी केलेले नाही. अडीच एकर क्षेत्रात वयाच्या १४व्या वर्षापासून त्यांनी प्रयोग सुरु केले. आज सापुचेतळे चांदोर भागात कृषी क्षेत्रातील जाणकार अशी प्रतिमा त्यांनी तयार केली.
जेमतेम पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे भावंडांचा शिक्षणाचा खर्चही पेलवत नसल्याने त्यांच्यापुढे आव्हान उभे राहिले. हे आव्हान कसे पेलायचे, हा प्रश्न उभा राहिल्याने त्यांनी शेतीत आपले मन रमवले. प्रचंड मेहनत घेतली व यशस्वी शेतकरी म्हणून प्रतिमा तयार केली. अडीच एकराची भातशेती आहे. त्यातून ५ खंडीपर्यंत उत्पन्न दरवर्षी घेतले जाते. शेतात राबण्यासाठी तीन मुलांसह पत्नीचाही आधार मिळत असल्याचे सांगतात. शिक्षक असलेला मुलगा यशवंत सुटीच्या दिवशी शेतीसाठी गावाकडे येतो अन् शेतीत मदत करतो.
बाळकृष्ण व पांडुरंग हे जे. के.मधील कर्मचारी होते. यांनीही शेतात मदत सुरु केली. विद्यमान सरपंच वैशाली बनकर यांनाही शेतीची आवड असल्याने हे संपूर्ण कुटूंब शेतात रमले आहे. यावर्षी १३० दिवसात बहरणारी सोना, रुपाली, सारभी, क्रांती या बियाण्यांची त्यांनी पेरणी केली. २ मणाचा पेरा दरवर्षी लागतो. मात्र, आजच्या कठीण परिस्थितीत स्वत:चे जोत असल्याने शेतीच्या मशागतीची कामे करण्यास स्वावलंबन उपयोगी ठरते. दिवसेंदिवस जनावरे बाळगणे कठीण होत असल्याने पुढील वर्षापासून शेतीत आधुनिक अवजारांचा वापर करण्यावर त्यांनी भर देण्याचे ठरविले आहे. बनकर यांना शेतीत या वयातही प्रयोग करून उत्पन्न वाढवावे, असे वाटते. त्यासाठी ते झटत आहेत. या वयातील त्यांचा आदर्श वाखाणण्यासारखा आहे.