खेड : तालुक्यात कोरोनाने दुसऱ्या टप्प्यात हाहाकार उडवला असून, अवघ्या ६१ दिवसांत ७० लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत ६९ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यावर्षी केवळ मे या एका महिन्यात ३७ लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला असून, नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आतातरी गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे.
खेड तालुक्यात एप्रिल २०२० मध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. मात्र त्यानंतर जुलै २०२० पर्यंत खेड तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली़; मात्र मृत्यूदर नियंत्रणात होता. जुलैपर्यंत ९ जणांनी कोरोना साथीत जीव गमावला. ऑगस्ट २०२० मध्ये मात्र या साथीने वेगाने पसरण्यास सुरुवात केली़. सप्टेंबर २० पर्यंत दोन महिन्यांत ५२ जणांचा बळी कोरोनाने घेतला. त्यानंतर मात्र वेगाने कोरोना साथ नियंत्रणात येत हाेती. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत केवळ नऊजणांना कोरोनाने आपला प्राण गमवावा लागला.
कोरोनाची पहिली लाट खेड तालुक्यात २०२१ च्या जानेवारीत संपत आहे, असे वाटत असतानाच फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्यात १०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली. सुरुवातीला लॉकडाऊन नको म्हणणाऱ्या नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी नंतर मात्र काही प्रमाणात प्राप्त परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिलमध्ये उच्चांक गाठला. या एका महिन्यात ११९६ जणांना खेड तालुक्यात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले, तर त्यापैकी ३३ जणांना आपला प्राण गमवावा लागला. मे २०२१ मध्येसुद्धा तालुक्यात कोरोनाचे मृत्यूतांडव सुरूच असून, तीस दिवसांत ३७ जणांचा त्याने बळी घेतला आहे. तालुक्यात मे २०२१ मध्ये सलग दुसऱ्या महिन्यात नवीन १०६९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
खेड तालुक्यातील ६५ ठिकाणी ॲक्टिव्ह कंटेन्मेंट झोन असून, २४१ ॲक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात एप्रिल २०२० पासून मे २०२१ पर्यंत एकूण ३ हजार ९८० रुग्ण आढळले आहेत़. त्यापैकी २ हजारपेक्षा जास्त रुग्ण लॉकडाऊन असतानाही गेल्या दोन महिन्यांत आढळले आहेत.
---------------------------
स्थानिक प्रशासन गंभीर नाही
खेड तालुका हा निर्विवादपणे कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे स्पष्ट असले, तरी येथे अद्याप स्थानिक पोलीस, प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता मात्र त्याबाबत फारशी गंभीर नसल्याचे दिसत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत तर खेडमध्ये अक्षरशः कोरोना साखळी तोडोऐवजी कोरोना साखळी जोडो अशी मोहीम असल्याचा भास हाेताे. बंद दुकानाच्या शटर बाहेर उभे राहून ग्राहकांना बोलावून वस्तू विकत व सेवा देत असून, हे काेराेनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.