७ हजार लोकांना मिळते गढूळ पाणी
By Admin | Updated: July 16, 2015 23:30 IST2015-07-16T23:30:26+5:302015-07-16T23:30:26+5:30
चिपळूण तालुका : आरोग्याचा प्रश्न उभा

७ हजार लोकांना मिळते गढूळ पाणी
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील पेढे पर्शुराम गावातील सुमारे ७ हजार लोक व विद्यार्थ्यांना गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथील लोकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खेड आणि चिपळूण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पेढे-पर्शुराम गावामध्ये सुमारे ७ हजार लोक आणि विद्यार्थीवर्ग आहे. त्यांना करण्यात येणारा पाणी पुरवठा हा गढूळ असल्याने येथील लोक व विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लोकांना शुध्द पाणी पुरवठ्याबाबत लोटे औद्योगिक वसाहत आणि जिल्हा परिषदेकडे मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सदस्य विश्वास सुर्वे यांनी सांगितले.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून पेढे पर्शुराम गावासाठी नळपाणी योजना मंजूर झाली आहे.
ही योजना निकषात बसत नसल्याचे कारण पुढे आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी त्या योजनेला बे्रक दिला आहे. त्यामुळे सदस्य सुर्वे यांनी ही योजना निकषात बसत नसेल तर इतर योजना निकषात कशा बसल्या, असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी कामे झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांचीही चौकशीची मागणी करावी लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे बोलताना सांगितले.
ग्रामपंचायतींची घरपट्टी वसूली बंद असल्याने पेढे पर्शुराम ग्रामपंचायतीकडे पाणी शुध्दिकरणासाठी पावडर खरेदी करण्यास पैसे नसल्याने डास निर्मुलन आणि पाणी शुध्दिकरणाची समस्या वाढली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सुर्वे यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)
स्थायी समितीच्या सभेत पेढे पर्शुराम होणाऱ्या गढूळ पाण्याच्या प्रश्नावरुन जोरदार चर्चा झाली होती. सभेत पेढे पर्शुराम गावाला टँकरने पाणी पुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुमारे ७ हजार लोकवस्ती असलेल्या गावाला किती दिवस टँकरने पाणी पुरवठा करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.