चिपळुणात ६५५ कुटुंबे शौचालयाविना
By Admin | Updated: July 9, 2015 23:47 IST2015-07-09T23:47:00+5:302015-07-09T23:47:00+5:30
नगर परिषद : सकारात्मक मानसिकता गरजेची

चिपळुणात ६५५ कुटुंबे शौचालयाविना
चिपळूण : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत येथील नगर आरोग्य विभागातर्फे शहराचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. घर तेथे शौचालय ही संकल्पना शहरात राबविली जाणार असल्याने मुदत संपूनही या योजनेसाठी अर्ज मागणी होत आहे. आजपर्यंत नगर परिषद आरोग्य विभागाकडे ६५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. घर तेथे शौचालयसाठी राज्य शासनाकडून ८ हजार रुपये, तर केंद्र शासनाकडून ४ हजार रुपये असे १२ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जून होती. ज्या व्यक्तीकडे स्वत:च्या मालकीची जागा आहे त्याला शौचालय उभारण्यासाठी हे अनुदान मिळू शकते. आतापर्यंत नगर परिषदेकडे ६५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, यामध्ये काहींच्या घरी शौचालय आहे, त्यांनीही अर्ज दाखल केले असल्याने त्याचा सर्व्हे आरोग्य विभागातर्फे सुरु आहे. प्रभागनिहाय अर्ज पाठविले जाणार असून, मुदत संपूनही अर्जांना अद्याप मागणी आहे. पहिल्या टप्प्यात ३३६ अर्ज सरकारकडे पाठविले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित अर्ज टप्प्याटप्प्याने पाठविण्याबाबत आरोग्यविभाग यंत्रणा काम करणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी करणे, आवश्यक ती कागदपत्र आहेत की नाही, हे पाहण्यासाठी संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांचा वेळही या कामासाठी जात आहे.
मात्र, नागरिकांनी सकारात्मकता मानसिकता दाखवल्यास शहरात स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक शौचालयावर दरवर्षी अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. घर तेथे शौचालय ही संकल्पना प्रत्यक्ष अमलात आल्यास शौचालय देखभाल व दुरुस्तीवर होणारा नगर परिषदेचा खर्चही वाचणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)