गुहागरात ६५ घरांचे पिण्याचे पाणी रोखले

By Admin | Updated: January 28, 2015 00:52 IST2015-01-27T22:15:42+5:302015-01-28T00:52:40+5:30

भातगावमधील प्रकार : पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

65 households in Guhagar have stopped drinking water | गुहागरात ६५ घरांचे पिण्याचे पाणी रोखले

गुहागरात ६५ घरांचे पिण्याचे पाणी रोखले

गुहागर : तालुक्यातील भातगाव धक्का येथील सुमारे ६५ घरांना पाणी पुरवठा होत असलेल्या नदीवर खासगीरित्या बांध घालून पाणीपुरवठा रोखण्यात आला आहे. याप्रकरणी पुरुषोत्तम गणेश करमरकर यांच्या विरोधात ग्रामस्थांनी गुहागरच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून सभापती राजेंद्र बेंडल यांनी ग्रामस्थांची तहसीलदारांबरोबर चर्चा घडवून आणली. तहसीलदार पाटील यांनी मंडल अधिकारी वरवडेकर यांना तातडीने पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भातगाव धक्का येथे ब्राह्मण, मराठा, कुणबी समाजातील सुमारे ६५-७० घरांमधून सुमारे १५० लोकवस्ती आहे. नळपाणी योजेनतील पंप नादुरुस्तीमुळे गावातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या पात्रातून ग्रॅव्हिटीने पाणी घेऊन ग्रामस्थ आपली तहान भागवत होते. गावातील पुरुषोत्तम गणेश करमरकर यांच्या जागेतून वाहणाऱ्या या नदीच्या उंचावरील भागातून करमरकर कुटुंबीय पूर्वापार पाटाचे पाणी उचलत होते. त्यांची पिण्याची गरज भागून नदीत वाहून जाणारे पाणीच सुमारे १५० ग्रामस्थांनी आपल्यासाठी वळवले होते. मात्र, करमरकर यांनी आपल्याला पुरेपूर पाणी मिळत असूनही वाहून जाणाऱ्या पाण्यावर पुन्हा बांध घालून ग्रामस्थांचे पाणी पळवले असल्याचे भातगाव येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.
दरम्यान, वैयक्तिक कामासाठी आलेल्या करमरकर यांना तहसीलदार पाटील यांनी बोलावून घेतले. नैसर्गिक जलस्त्रोतांवर कोणाचीही मालकी नसल्याचे त्यांनी करमरकर यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदी माझ्याच जमिनीतून जाते, त्यामुळे पाणी माझे आहे, असा अट्टाहास करमरकर यांनी धरल्याचे पुढे आले आहे. मंडल अधिकारी उद्या प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन पाहणी करतील. त्यांच्या अहवालानुसारच कार्यवाही होईल. परंतु नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळणारे पाणी कुणालाही खासगीरित्या रोखता येणार नाही, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 65 households in Guhagar have stopped drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.