पाच जागांसाठी ६५ उमेदवारांचे अर्ज
By Admin | Updated: September 28, 2014 00:23 IST2014-09-28T00:23:32+5:302014-09-28T00:23:32+5:30
एकाच दिवशी विक्रमी ५९ अर्ज : चारही प्रमुख पक्षांना उमेदवार सापडले

पाच जागांसाठी ६५ उमेदवारांचे अर्ज
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी आज, शनिवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात एकूण ४१ उमेदवारांचे विक्रमी ५९ अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील
पाच जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. यादी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि युती-आघाडीतील फाटाफूट यामुळे शनिवारी ४१ अर्ज दाखल झाले. त्यात दापोलीतून सर्वाधिक १२, गुहागरातून ४, चिपळुणातून ९, रत्नागिरीतून १० आणि राजापुरातून ६ असे एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच इच्छुक उमेदवारांनी आज आपले अर्ज सादर केले. दापोलीतून अजित तांबे (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया), आदम अब्दुल चोगले (बहुजन मुक्ती मोर्चा), सूर्यकांत दळवी (शिवसेना), वैभव खेडेकर (मनसे), संजय कदम (राष्ट्रवादी), अॅड. सुजित झिमण (काँग्रेस), किशोर देसाई (अपक्ष आणि काँग्रेस), ज्ञानदेव खांबे (बसपा), सुनील खेडेकर (अपक्ष), प्रविण कोलगे (शेतकरी कामगार पक्ष), प्रदीप गंगावणे या बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
गुहागरात सुरेश गमरे (बसपा), विजय असगोलकर (काँग्रेस), विजयकुमार भोसले (शिवसेना), भास्कर जाधव (राष्ट्रवादी) या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
चिपळुणात अनंत विश्राम जाधव (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया - आठवले गट), लियाकत शाह (अपक्ष), अशोक जाधव (काँग्रेस), रश्मी कदम (काँग्रेस), माधव गवळी (भाजप), यशवंत तांबे (रिब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कांबळे गट), गोपीनाथ झेपले (अपक्ष), उमेश पवार (बहुजन मुक्ती पार्टी), संतोष गुरव (अपक्ष) या नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
रत्नागिरीतून उदय सामंत (शिवसेना), दिनेश पवार (बसप), संदीप गावडे (अपक्ष), नंदकुमार मोहिते (बहुजन विकास आघाडी), रमेश कीर (काँग्रेस), बशीर मुतुर्जा (राष्ट्रवादी), उदय सावंत (अपक्ष), मनीष तळेकर (अपक्ष), प्रवीण जाधव (अपक्ष) आदी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
राजापुरातून राजेंद्र देसाई, अजित यशवंतराव (राष्ट्रवादी), संजय यादवराव (भाजप), रुपेश विजय गांगण(भाजप), संदीप सखाराम कांबळे (आरपीआय), गणपत रामचंद्र जाधव (अपक्ष) या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातून ६५ उमेदवारांचे १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत.
या सर्व अर्जाची छाननी आता सोमवारी (दि. २९) होणार आहे. (प्रतिनिधी)
दापोली राष्ट्रवादीत बंडखोरी?
दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संजय कदम यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र, येथील राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. येथे काँग्रेसचा उमेदवार असताना त्यांनी काँग्रेसतर्फेही अर्ज केला आहे. ते आपला अर्ज कायम ठेवणार की मागे घेणार, हा चर्चेचा विषय झाला आहे.
विक्रमी अर्ज
एकाच दिवशी ५९ अर्ज दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. यादी जाहीर होण्यात झालेला विलंब आणि युती-आघाडीत झालेले वाद यामुळे शेवटच्या क्षणी सर्वपक्षीयांचे अर्ज दाखल झाले.