५८५ बचत गटांमुळे चिपळुणातील कुटुंबांना भक्कम आधार
By Admin | Updated: July 14, 2015 21:55 IST2015-07-14T21:55:20+5:302015-07-14T21:55:20+5:30
हजारोंचा उदरनिर्वाह : महिलांची रोजीरोटी ठरवणारे गट

५८५ बचत गटांमुळे चिपळुणातील कुटुंबांना भक्कम आधार
अडरे : चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात ५८५ महिलांचे बचत गट असून, या बचत गटामुळे कुटुंबांना आधार मिळत आहे. ग्रामीण भागातील महिला सक्षम होण्यासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शासन स्तरावर महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. चिपळूण तालुक्यात १७५ बचत गट बंद स्थितीत आहेत. कार्यरत असलेल्या बचत गटांच्या माध्यमातून लघुउद्योगाची निर्मिती करण्याकडे अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे या उद्योगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाला आधार मिळू लागला आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानअंतर्गत ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या बचत गटांना चालना मिळत आहे. बचत गटांना बँकांकडून मिळणाऱ्या कर्जामुळे उद्योगांना चालना मिळत आहे. मागील वर्षी जवळपास ४० महिला बचत गटांनी कर्ज घेतले होते. कर्ज परतफेडीसाठी ९८ टक्के प्रतिसाद आहे. पंचायत समितीतर्फे मागील वर्षी १००चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७६चे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यावर्षी १५०चे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तालुक्यातील पेढांबे येथील सद्गुरु कृपा महिला बचत गटाने लघुउद्योग, कौंढर ताम्हाणे येथील नवलेश्वरी महिला बचत गटाने किराणा साहित्य, कोंढे येथील मैत्री महिला बचत गट व ऋणानुबंध गटाने भाजी व्यवसाय, डेरवण येथील महालक्ष्मी बचत गटाने खानावळ, मार्गताम्हाणे येथील बचत गटाने दुग्ध व्यवसाय, खेर्डी येथील जय दुर्गा माता महिला बचत गटाने लघुउद्योग व पिंपळी येथील सद्गुरु कृपा महिला बचत गटाने भांडी व्यवसाय, रावळगाव येथील बचत गटाने भाजीपाला, पाचाड येथील खेम वाघजाई व समर्थ महिला गटाने बुरुड व्यवसाय सुरु केला आहे. (वार्ताहर)