५१ गावांतील जमिनींचे व्यवहार ठप्प
By Admin | Updated: October 24, 2015 00:39 IST2015-10-23T21:11:18+5:302015-10-24T00:39:04+5:30
इको-सेन्सिटिव्हचा फटका : शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील परिस्थिती

५१ गावांतील जमिनींचे व्यवहार ठप्प
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम घाटातील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ५१ गावांना अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे. याचा परिणाम म्हणून तालुक्यातील आंबा, मलकापूर, गजापूर, करंजफेण, शित्तूर वारुण, आदी गावांतील जमिनींचे संपूर्ण व्यवहार थंड पडले आहेत. जमिनींची खरेदी-विक्री थांबल्याने जमिनी खरेदी करू इच्छिणाऱ्यांची मोठी पंचाईत आली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीचा पट्टा व पश्चिम घाटातील ५१ गावांचा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश झाला आहे. त्यातील काही गावांचा बफर झोन, व्याघ्र प्रकल्पांमध्ये समावेश झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील ५६,८२५ चौरस कि.मी. इतके क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १८४ गावांपैकी शाहूवाडी तालुक्यातील ५१ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्रात १७.३४० चौरस कि़मी. क्षेत्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे.
तालुक्यातील आंबा शहर पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना येथील विकासकामावर इको-सेन्सिटिव्ह झोनचा परिणाम झाला आहे. मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, आदी शहरांतील व्यावसायिकांनी आंबा, मलकापूर, गेळवडे, आदी परिसरात जमिनी खरेदी केल्या आहेत. आंबा येथे मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, विश्रामगृह, एन. ए. प्लॉट, खरेदी-विक्री सुरू होती. बारा ते पंधरा लाख रुपये एक एकरचा दर सुरू होता. तर एन. ए. प्लॉटचा दर तीन ते चार लाख रुपये सुरू होता. दरम्यान, हा परिसर इको-सेन्सिटिव्ह, बफर झोन, व्याघ्र प्रकल्प, आदी घोषित झाला आहे. त्यामुळे येथील जमीन खरेदी करण्यास व्यावसायिक येत नसल्यामुळे संपूर्ण खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले आहेत.
याचा परिणाम येथील हॉटेलवरदेखील झाला आहे. आंबा, चाळणवाडी, तळवडे, चांदोली परिसरातील जमिनीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. मात्र, सध्या आर्थिक मंदीचा फटका या व्यवहाराला बसला आहे. येथील स्थानिकांना छोटी-मोठी कामेदेखील मिळेनाशी झाली आहेत. (प्रतिनिधी)