जिल्ह्यात एसटीच्या ५० बसेस विजेवर धावणार, खर्चात बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:32+5:302021-09-02T05:06:32+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अद्ययावत सेवा देत असतानाच इंधन खर्च कमी करण्यासाठी ...

जिल्ह्यात एसटीच्या ५० बसेस विजेवर धावणार, खर्चात बचत
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अद्ययावत सेवा देत असतानाच इंधन खर्च कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व विभागांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. रत्नागिरी विभागाकडून सुरुवातीला विजेवरील ५० गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारमान घटल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे. उत्पन्नातील घट भरून काढण्यासाठी इंधन खर्च कमी करण्याची आवश्यता आहे. त्यावर पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या गाड्या सेवेत आणण्यात येणार आहेत. रत्नागिरी विभागात सुरुवातीला विजेवरील ५० गाड्या येणार आहेत.
रत्नागिरी, चिपळूण मार्गावर धावणार
महामंडळाकडून विजेवरील बसेसबाबत माहिती मागविण्यात आली असता, सुरुवातीला पन्नास गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर मार्गांवर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. परंतु गाड्यांबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध झालेनंतरच योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.
आणखी सहा महिने लागणार
- विजेवरील बसेस चालविण्याबाबत राज्य परिवहन महामंडळ सकारात्मक आहे.
- प्रत्येक विभागाकडून सुरुवातीला किती गाड्या चालविणार याचा आढावा घेण्यात येत आहे.
- एकत्रित आढाव्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर विजेवरील बसेस विभागातून सुरू केल्या जातील.
- बसेस मार्गावर धावण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता
विजेवरील बसेस वापरात आणण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. गाड्यांसाठी चार्जिंग पाॅइंटची मध्यवर्ती ठिकाणी सुविधा करण्यात येणार आहे. यामुळे साहजिकच इंधन खर्च तर वाचेल शिवाय प्रदूषणही कमी होईल. महामंडळाचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह असून भविष्यात याचा फायदा महामंडळाच्या सर्व विभागांना होणार आहे.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
- रत्नागिरी विभागात ५० विजेवरील गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी चार्जिंग स्टेशन मध्यवर्ती ठिकाणी उभारले जाणार आहे.
- शहराजवळील टीआरपी येथील विभागीय कार्यशाळा येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय विचाराधीन आहे.
- रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार मोठा असल्याने महामार्गावरील प्रमुख आगारात चार्जिंग स्टेशन महामंडळाच्या सूचनेनुसार उभारण्यात येतील.
खर्चात होणार बचत
बस विजेवर चालणार असल्याने त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. परंतु, चार्जिंग स्टेशनसाठी वीजपुरवठा कोणत्या दराने होणार याबाबत अद्याप काही स्पष्टता नाही. रत्नागिरी विभागात लाॅकडाऊनपूर्वी दैनंदिन ७५० गाड्यांद्वारे ४५०० फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यामुळे दररोज ४८ ते ५० लाखांचा डिझेल खर्च आहे. प्रवासी भारमानामुळे पन्नास लाख उत्पन्न प्राप्त होत असले तरी त्यातून केवळ इंधन खर्चच भागत होता. अन्य खर्चासाठी महामंडळाकडे मागणी करावी लागत होती; परंतु विजेवरील एसटीमुळे कदाचित खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. विजेवरील बस किती किलोमीटरपर्यंत धावेल, याबाबत काहीच स्पष्ट माहिती कळविलेली नसल्यामुळे एकूण खर्चाचे ठोकताळे बांधणे अवघड आहे.