मत्स्योत्पादनामध्ये ५० टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:45+5:302021-08-22T04:34:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वेगवेगळ्या पद्धतीच्या मासेमारीचे वाढलेले प्रमाण, वादळी वातावरण आणि समुद्रातील प्रदूषण यामुळे जिल्ह्याच्या मासळी उत्पादनामध्ये ...

मत्स्योत्पादनामध्ये ५० टक्क्यांनी घट
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वेगवेगळ्या पद्धतीच्या मासेमारीचे वाढलेले प्रमाण, वादळी वातावरण आणि समुद्रातील प्रदूषण यामुळे जिल्ह्याच्या मासळी उत्पादनामध्ये गेल्या सात वर्षांत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मासळीचे उत्पादन ६५,३७४ मेट्रिक टन झाले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात हेच उत्पादन १,१५,०४२ मेट्रिक टन इतके होते. दरवर्षी होत असलेली ही घट मच्छिमारांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला असून, मच्छिमार कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यासमोर भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या क्षेत्रात १३ मासेमारी केंद्रे असून, किनाऱ्यावर असलेल्या १०४ गावांमध्ये बहुसंख्य मच्छिमार लोकच राहतात. जिल्ह्यात सन २००३ च्या गणनेनुसार मच्छिमारांची संख्या ६७,६१५ आहे. जिल्ह्यात ३,०७७ यांत्रिकी नौका, ४४२ बिगर यांत्रिकी नौका, ४६ मासळी उतरविण्याची केंद्रे, ८५ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, ३४ बर्फ कारखाने आहेत.
मत्स्योपादनात घट होण्यासह इतरही अनेक समस्या मच्छिमारांसमोर उभ्या आहेत. सततच्या वादळी वातावरणामुळे खोल समुद्रातील मासेमारी अनेकदा ठप्प असते. वेगवेगळ्या कंपन्यांमुळे समुद्रात झालेले प्रदूषण, त्याचबरोबर त्यांच्यासमोर खलाशांचा प्रश्न भेडसावत आहे. शिवाय डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने त्याचा खर्चही भागत नाही. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या डिझेलवरील सबसिडीच्या रकमेसाठी तीन-तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्यासमोर मासेमारी व्यवसाय कसा करायचा, अशी चिंता त्यांना सतावत आहे.
सन २०१४-१५ मध्ये मत्स्य उत्पादन १,१५,०४२ मेट्रिक टन होते. त्यामध्ये घट होऊन सन २०१५-१६ मध्ये तेच उत्पादन १८ हजार टनांनी घटल्याने ८७,०३० मेट्रिक टनावर आले. मात्र, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात त्यामध्ये ११ टनांनी वाढ होऊन ते ९८,४४३ मेट्रिक टन झाले. मात्र, त्यानंतरच्या पुढील चार वर्षांत मत्स्य उत्पादनात दरवर्षी घट झाल्याने मासेमारी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत.
मागील सात वर्षांतील मत्स्योपादन
सन मेट्रिक टन
२०१४-१५ १,१५,०४२
२०१५-१६ ८७,०३०
२०१६-१७ ९८,४४३
२०१७-१८ ८०,३४०
२०१८-१९ ७३,७३८
२०१९-२० ६६,१७३
२०२०-२१ ६५,३७४
-------------------------------
मत्स्य उत्पादन कमी होण्याची कारणे अनेक आहेत. गेल्या वर्षात पर्ससीननेटने प्रमाणापेक्षा जास्त झालेली मासेमारी, मागील दोन वर्षांत लाईटच्या आधारे करण्यात येणारी मासेमारी, वादळी वातावरण, भूगर्भात होणारे बदल आणि किनारपट्टीवरील कारखान्यांकडून हाेणारे प्रदूषण यामुळे जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर परिणाम होऊन मत्स्य उत्पादन कमी झाले आहे. यावर शासनाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.
- शब्बीर भाटकर,
माजी चेअरमन,
रत्नागिरी मच्छिमार सोसायटी, राजिवडा, रत्नागिरी.