५ वर्षे रखडलेल्या कामांचा निधी परत?

By Admin | Updated: August 5, 2014 23:39 IST2014-08-05T21:38:42+5:302014-08-05T23:39:18+5:30

पर्यटन विकास : जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिपळूण नगर परिषदेला पत्र, कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस

5 years paid back to work? | ५ वर्षे रखडलेल्या कामांचा निधी परत?

५ वर्षे रखडलेल्या कामांचा निधी परत?

चिपळूण : बारावा वित्त आयोग, सागरी किनारा व सृष्टी पर्यटन विकास योजनेअंतर्गत पाच वर्षांपूर्वी चिपळूण नगर परिषदेला २ कोटी ९० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, विविध विकासकामे अद्याप प्रलंबित असल्याने उर्वरित निधी जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपरिषद प्रशासनाला पत्राद्वारे करण्यात आली आहे. रामतीर्थ तलाव, पुरुषोत्तम व शंकर महादेव पुतळ्याजवळ संरक्षक भिंतीचे काम करणे, पर्यटकांना बसण्याची आणि शौचालयाची सुविधा निर्माण करणे, यासाठी ४० लाखांचा निधी यापूर्वी वितरित झालेला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून खर्च झालेल्या २७ लाख ५४ हजार रुपयांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. त्यामुळे या कामावरील उर्वरित निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करावा व सद्यस्थितीत काम थांबवावे, असे आदेश दिलेले असतानाही त्याची ंअंमलबजावणी झालेली नाही. विरेश्वर तलावाच्या शेजारी पथदिव्याचे बांधकाम करणे, कठडे बांधणे, झाडे लावणे, शौचालय व अल्पोपाहार सुविधा निर्माण करणे, या कामांवर १ लाख ३४ हजारांचा निधी खर्च होणे बाकी आहे, असेही नगर परिषदेच्या प्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले. आवश्यक सुविधा विकसित करणे, याअंतर्गत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे काम आहे, त्या स्थितीत थांबविण्यात यावे. या कामासाठीचा ६० लाख रुपयांचा निधी तत्काळ परत करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. गोवळकोट येथे जेटीचे बांधकाम करण्यासाठी ५० लाखांचा निधी नगर परिषद प्रशासनाला प्राप्त असून, निविदा मंजुरी रक्कम ४०.४८ लाखाच्या तुलनेत प्रत्यक्ष खर्च ४०.४२ लाखाचा अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करण्यात आला आहे. हा निधी पूर्वपरवानगीशिवाय अदा करण्यात येऊ नये, अशी सूचनाही जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केली आहे. नगर परिषद प्रवेशद्वाराजवळ सौंदर्यीकरण करणे, दिशादर्शक फलक लावणे, भू रेखांकन करणे, यांकरिता ५० लाखांचा निधी मंजूर आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी पाटील यांनी दिले होते. मात्र, या कामाबाबत कार्यवाही झालेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ही कामे थांबवावीत, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. गोवळकोट येथील विकासकामांची प्रत्यक्षात पाहणी केली असता अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे रिटेनिंग वॉलसाठी जांभ्या दगडाचा वापर करण्यात आलेला नाही. मंजुरी दिलेल्या आराखड्याप्रमाणे जागेच्या बांधकामात रेस्टॉरंटच्या जागेत बदल करण्यात आला आहे. ही कामेही अद्याप अपूर्ण आहेत. (वार्ताहर)

---पर्यटन विकास चिपळूण नगर परिषद योजनेअंतर्गत मंजूर झालेली विकासकामे रखडली असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट झाले आहे. यामध्ये विविध ६ कामांचा समावेश आहे. याबाबत सत्ताधारी मात्र मूग गिळून असून, पर्यटन विकास निधी परत निघालाय आणि पर्यटनावर माहिती पट तयार करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याबाबत आपण बोलल्यानंतर टीकेचे लक्ष केले जात आहे, असे मत सुरेखा खेराडे यांनी व्यक्त केले.
----कामे मंजूर होऊनही ती पूर्ण होण्यास विलंब होत असेल तर ठेकेदार व वास्तुविशारद यांना कायमस्वरुपी शासनाच्या काळ्या यादीत टाकण्याबाबतचा प्रस्ताव योग्य त्या यंत्रणेकडून आवश्यक ती मंजुरी घेऊन पाठवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनाला केली आहे.
----२००९-१० मध्ये मंजूर केलेल्या २ कोटी ९० लाखांच्या निधीपैकी काही खर्च अद्यापही खर्च झालेला नाही. शासनाची परवानगी न घेता कामात बदल करण्यात आला आहे. याबाबत कारवाई का करण्यात येऊ नये असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सर्व कामांचा अहवाल लवकर पाठविण्याची सूचना दिली आहे.

Web Title: 5 years paid back to work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.