धोपेश्वर-तिठवलीत ५ वर्षांनी होळी
By Admin | Updated: February 19, 2015 23:46 IST2015-02-19T22:53:42+5:302015-02-19T23:46:28+5:30
वाद मिटवल्याने उत्साह : पोलीस निरीक्षकांचा पुढाकार

धोपेश्वर-तिठवलीत ५ वर्षांनी होळी
राजापूर : मागील चार-पाच वर्षांपासून होळीचा सण कुणी साजरा करायचा, हा निर्माण झालेला वाद राजापूर पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी संपुष्टात आणल्याने धोपेश्वर - तिठवलीचा होळी उत्सव यावर्षी धडाक्यात साजरा होणार आहे.
धोपेश्वर - तिठवली या गावात श्री भराडीन देवीचा होळी उत्सव कुणी साजरा करायचा, यावरुन मागील पाच वर्षांपासून वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर तिठवलीचे ग्रामस्थ दत्ताराम तिर्लोटकर यांनी पोलिसांना निवेदन देताना गावातील सुमारे २० ते २५ घरांमध्ये पालखी नेण्यात येत नसल्याची तक्रार केली होती. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी पोलीस ठाण्यात बैठक बोलावली. त्याला दोन्ही बाजूंची मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये स्वत: तक्रारदार दत्ताराम तिर्लोटकर, प्रकाश कातकर, भालचंद्र तेरवणकर, कृष्णा ठुकरुल आदी उपस्थित होते.दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी यशस्वी मध्यस्थी केली. समस्त ग्रामस्थांनी आपापसातील वाद-विवाद मिटवत व शांततापूर्वक वातावरणात होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन केले. वाद मिटवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. त्याला उपस्थित ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला व वाद संपुष्टात आणला. त्यानुसार आगामी होळी उत्सव एकत्रित साजरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे गावात नव्या जोमाने होळीचा सण साजरा होणार आहे. तसेच जवळेथर येथील वादात सापडलेल्या होळीच्या सणाबाबत शनिवार, दि. २१ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशीही माहिती पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी दिली. राजापूर तालुक्यातील परंपरागत सुरू असलेला शिमगा आता शांततामय वातावरणात होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)