बाधित रस्ता दुरुस्तीचे ४६ लाखांचे प्रस्ताव पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:13+5:302021-09-02T05:07:13+5:30
राजापूर : अतिवृष्टीने बाधित झालेल्या राजापूर तालुक्यातील कोदवली- रानतळे -धारतळे रस्ता, तळवडे पाचल पूल आणि अणुस्कुरा घाट दुरुस्तीसाठी सार्वजनिक ...

बाधित रस्ता दुरुस्तीचे ४६ लाखांचे प्रस्ताव पडून
राजापूर : अतिवृष्टीने बाधित झालेल्या राजापूर तालुक्यातील कोदवली- रानतळे -धारतळे रस्ता, तळवडे पाचल पूल आणि अणुस्कुरा घाट दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूरकडून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या सुमारे ४८ लाखांच्या प्रस्तावांना दीड महिना उलटला तरी शासनाने मंजुरीच दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या रस्ता व पुलावरून वाहतूक बंद असून, अणुस्कुरा घाटातून धोकादायक परिस्थितीत वाहतूक सुरू आहे.
विकासकामांसाठी निधी आणला अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकून कायमच ‘चमकोगिरी’ करणाऱ्या या लोकप्रतिनिधींना या रस्ता, पूल आणि घाटाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून तातडीने प्रस्ताव मंजूर करून घेऊन निधी आणण्यास कुणी रोखले आहे काय, असा उपरोधिक प्रश्न आता लोक करत आहेत. १३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत राजापूर-कोदवली-रानतळे धारतळे मार्ग पुन्हा खचला आहे. एक बाजू पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक, एस. टी. वाहतूक बंद झाली आहे. लाेकांची गैरसोय लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी आगार प्रशासनाने रानतळे येथून या भागात जाणाऱ्या एस. टी. बस सुरू केल्या आहेत. मात्र राजापूरकडून साखळकरवाडी मार्गे जाणारा मार्ग अत्यंत धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एका एसटीला विद्युतवाहिनी लागल्याने शॉकही लागला होता. सुदैवाने प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
राजापूर-कोदवली-रानतळे धारतळे मार्ग बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर कार्यालयाकडून सुमारे १२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे, मात्र दीड महिना झाला तरी शासनाने या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही.
२३ जुलैच्या अतिवृष्टीत पूर्व भागातील तळवडे पाचल मार्गावरील पूल वाहून गेला आहे. अणुस्कुरा घाटात पाच ते सहा ठिकाणी दरड कोसळून हा रस्ता बंद झाला होता. तळवडे पाचल रस्त्यावरील वाहतूक अद्याप बंद आहे. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे २२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यालाही मंजुरी मिळालेली नाही. या ठिकाणीही एस. टी. व अन्य वाहतूक ठप्प आहे. याचा फटका या भागातील लोकांना बसत आहे. अणुस्कुरा घाटातील दरड तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करून येथे वाहतूक सुरू केली आहे. मात्र घाटात कधीही पुन्हा दरड कोसळण्याचा धोका असून, याच धोकादायक मार्गावरून वाहतूक सुरू आहे. या घाटातील दरड प्रवणक्षेत्र भाग दुरुस्तीसाठी १२ लाखांचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे शासनाकडे पाठविलेला आहे. मात्र तोही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या राजापूर-रानतळे रोड व तळवडे पाचल पुलाचीही तात्पुरती दुरुस्ती करून यावरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ती तात्पुरत्या स्वरूपाची आणि धोकादायक ठरणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार आहेत. मात्र सत्तेत असूनही आपत्ती काळात झालेल्या या दुरवस्थेच्या दुरुस्तीसाठी निधी आणण्यात त्यांना अपयश आले आहे.