४६ संपकरी डॉक्टर्सच्या सेवा समाप्त
By Admin | Updated: July 5, 2014 00:36 IST2014-07-05T00:34:37+5:302014-07-05T00:36:44+5:30
लालमन नारोळे यांची माहिती : ‘राष्ट्रीय ग्रामीण’च्या ३१ डॉक्टर्सवरही कारवाई शक्य

४६ संपकरी डॉक्टर्सच्या सेवा समाप्त
रत्नागिरी : नोटीस देऊनही मॅग्मोच्या संपात सहभागी झालेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा अभियानातील जिल्ह्यात कार्यरत ५० पैकी ४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आज समाप्त करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या ३१ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपात सहभाग घेतल्यास सेवा समाप्त केली जाईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लालमन नारोळे यांनी दिली.
१ जुलै २०१४पासून राज्यभरातील शासकीय रूग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील २००पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णसेवेवर परिणाम झाला आहे. रूग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. राज्य सरकारने या संपाची गंभीर दखल घेत संपकरी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचे शस्त्र उचलले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा अभियानचे जिल्ह्यात ५० वैद्यकीय अधिकारी आहेत. यातील ५० पैकी ४६ अधिकारी संपात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)