विभागातील ४४५ बसेस ‘कोरोना फ्री’, प्रवाशांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:03+5:302021-09-18T04:35:03+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ...

विभागातील ४४५ बसेस ‘कोरोना फ्री’, प्रवाशांकडून स्वागत
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४४५ गाड्यांना ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ करण्यात आले आहे. महामंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे प्रवाशांतून स्वागत करण्यात येत आहे.
प्रवाशी गाडीत शिरल्यावर ठिकठिकाणी स्पर्श होत असतो. एस.टी.तील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, चालक केबिन, फ्लोअरिंग, रबर ग्लेझिंग्ज, प्रवासी येण्या-जाण्याचा मार्ग, आतील बाजूला, सामान कक्षाच्या बाहेरील व आतील बाजूला ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग करण्यात आले आहे. एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कोरोना व साथरोग पसरविणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण होणार आहे.
महामंडळाने सुरक्षितता जपली
गणेशोत्सवापूर्वी महामंडळाने कोरोना व अन्य साथरोग पसरविणाऱ्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’चा निर्णय घेतला होता. गणेशोत्सवापूर्वी नाही; परंतु गणेशोत्सवात कोटिंग पूर्ण करून प्रवाशांची सुरक्षितता जपली आहे.
- रमेश पानगले, कोतवडे
‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ सुरक्षित प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे. दर सहा महिन्यांनी कोटिंग केले जाणार आहे. कोरोनाकाळात एस.टी.ने प्रवाशांच्या हितार्थ घेतलेला निर्णय नक्कीच स्तुत्य असून, महामंडळाने सुरक्षित प्रवासाची बांधिलकी राखली आहे.
-सोनम कोलगे, चांदेराई
गणेशोत्सवापूर्वी ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ करणारे पथक विभागात दाखल झाले होते. आगारनिहाय गाड्यांची संख्या निश्चित केली होती. त्यानुसार कोटिंगचे काम करण्यात आले आहे. कोटिंगमुळे प्रवासी सुरक्षित झाले आहेत.
- अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी
वर्षातून दोनवेळा काेटिंग
रत्नागिरी विभागात एकूण ८३२ गाड्या आहेत. पैकी ४४५ गाड्यांना कोटिंग करण्यात आले आहे. कोटिंगची क्षमता सहा महिने असल्याने पुन्हा सहा महिन्यांनंतर नव्याने कोटिंग केले जाणार आहे. अर्थात वर्षभरात दोन वेळा गाड्यांना कोटिंग केले जाणार आहे. महामंडळाच्या निर्णयानुसार उर्वरित गाड्यांचे कोटिंग पूर्ण केले जाणार आहे.
सुरक्षिततेला प्राधान्य
गणेशोत्सवामुळे सर्वसामान्यांची लाल परी म्हणून ओळखली जाणारी एस.टी सध्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. एस.टी.च्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ॲंटिमायक्रोबिअल जंतुनाशक केमिकल कोटिंग गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे महामंडळाने निश्चित केले होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेला महामंडळाने प्राधान्य दिले आहे.
आगारनिहाय कोटिंग
‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’साठी महामंडळाने एका कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वीच कंपनीचे पथक दाखल झाले होते. रत्नागिरी आगारापासून सुरुवात करण्यात आली. राजापूर, लांजा व त्यानंतर टप्प्याटप्प्याने नऊ आगारांतील बहुतांशी कोटिंग पूर्ण करण्यात आले आहे.