संगमेश्वरातील ४०० ग्राहक सदाेष वीज मीटर बदलण्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:25+5:302021-06-30T04:20:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आरवली : संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक अर्ज करत आहेत. मात्र, महावितरण ...

संगमेश्वरातील ४०० ग्राहक सदाेष वीज मीटर बदलण्याच्या प्रतीक्षेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरवली
: संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक अर्ज करत आहेत. मात्र, महावितरण कंपनीकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. वीज वसुलीबाबत सतर्क असणारी महावितरण कंपनी सदोष मीटर बदलण्याबाबत मात्र चालढकल करत असल्याने सुमारे ४०० वीजग्राहक सदाेष मीटर बदलण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र नाहक त्रास व भुर्दंड सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
लाॅकडाऊन काळातील वसुलीबाबत कंपनीकडून आडमुठ्या धोरणाचा अवलंब करत वसुली मोहीम राबविली जात आहे. वीजग्राहकांना सेवा देताना मात्र कंपनी नेहमीच हात आखडता घेत आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्याभोवती झाडे, वेली यांचे साम्राज्य पसरले आहे. तर काही ठिकाणी विद्युत खांब पूर्णपणे धोकादायक अवस्थेत आहेत. तर अनेक वर्षे जुन्या वीजवाहिन्या जनतेच्या जिवाशी खेळतानाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. याबाबत तक्रार केल्यास अपुरे मनुष्यबळ, ठेकेदाराची अकार्यक्षमता अशी अनेक कारणे सांगून ग्राहकांची बोळवण केली जात आहे. गेली दोन वर्षांपासून ग्राहकांचे बंद असणारे सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक कंपनीकडे हेलपाटे मारत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. यावर मात्र कंपनीकडून मीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून चालढकल केली जात आहे.
याबाबत शाखा अभियंता मंदार शिंदे यांना विचारणा केली असता जवळ जवळ चारशे ग्राहक सदोष मीटर बदलण्यासाठी प्रतीक्षेत असून, सतत तक्रारी येत आहेत. मात्र, मीटरचा होणारा पुरवठा हा पुरेसा नसल्याने अडचणी येत आहेत. महिन्याला साधारणत: वीस मीटर मिळत असून, नवीन कनेक्शन देणे, जुने चक्री मीटर बदलून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे यासाठीच ही संख्या पुरेशी नाही. त्यामुळे सदोष मीटर बदलण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. आपण यापूर्वी वरिष्ठांना कळविले असून, पुन्हा एकदा सदोष मीटरची प्रतीक्षा यादी पाठवणार असल्याचे सांगितले.