४० वर्षीय प्रौढाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:21+5:302021-09-14T04:37:21+5:30
लांजा : घरापासून जवळच असलेल्या माळरानावर एका ४० वर्षीय तरुणाने शर्टाच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील ...

४० वर्षीय प्रौढाची आत्महत्या
लांजा : घरापासून जवळच असलेल्या माळरानावर एका ४० वर्षीय तरुणाने शर्टाच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील कुरचुंब सुवारेवाडी येथे घडल्याचे सोमवारी उघडकीस आले. धनंजय वासुदेव ताम्हणकर असे त्याचे नाव आहे. मद्याच्या नशेत त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरचुंब सुवारेवाडी येथील धनंजय ताह्मणकर याला दारूचे व्यसन होते. रविवारी सकाळी १० वाजता तो दाभोळे येथे चिकन आणण्यासाठी गेला होता. दारू पिऊन तो दुपारी घरी आला. जेवण झाल्यानंतर तो संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घरामध्येच होता. सायंकाळी ५ नंतर तो घराबाहेर पडला होता. रात्र झाली तरी तो घरी न आल्याने त्याचे वडील वासुदेव व भाऊ मुकेश यांनी शोधाशोध केली. मात्र, तो कुठेच आढळला नाही.
सोमवारी सकाळी वाडीतील सुनील सुवारे हे आपल्या बकऱ्या चारण्यासाठी म्हाराडी येथे गेले असता त्यांना धनंजयने शर्टाच्या साहाय्याने खैराच्या झाडाला गळफास लावून घेतल्याचे त्यांना दिसले. त्याने तत्काळ ही माहिती त्याच्या घरच्यांना दिली. धनंजयचे वडील व भाऊ लगेचच घटनास्थळी आले. वासुदेव ताह्मणकर यांनी लांजा पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे, अमोल दळवी, चालक चेतन घडशी आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
धनंजय अविवाहित असून, आई - वडील व एका भावासोबत तो राहत होता.